Weight loss breakfast: आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोक वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. बदलेली जीवनशैली त्यामुळे आहारात झालेले बदल, शरीराच्या कमी झालेल्या हालचाली या गोष्टींमुळे वजन वेगाने वाढते. आपण वजन कमी करण्यासाठी विविध गोष्टी करत असतो. कुणी एकरसाईज तर कुणी डाएट अनेकदा लोक सर्जरी करण्यासाठीदेखील तयार होतात. मात्र हे सर्व करण्याची गरज नाही. तुम्ही जर तुमच्या खानपानात बदल केला तर वेगाने वजन घटवू शकता. कारण आपण काय खातो हेसुद्धा वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
अलीकडे खानपानात प्रचंड बदल झाला आहे. करिअर, शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा त्यातून आलेला तणाव, आणि ते दूर करण्यासाठी खाल्लेले जंकफूड अशाने वजन वाढत जाते. अलीकडे बाहेरील पदार्थ खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मुलांपासून पालकांपर्यंत सर्वजनकज पिझ्झा, पास्ता, बर्गर अशा गोष्टी वारंवार खात असतात. त्यामुळे वजन वेगाने वाढते. वजन वाढल्यांनंतर अनेकांना फॅन्सी डाएट करणे शक्य नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही हा पर्याय सुचविणार आहोत. वजन कमी करताना तुम्ही घरात नाश्त्यात असलेले देसी पदार्थ खाऊनच वेगाने वजन कमी करू शकता. पाहूया हे पदार्थ कोणते आहेत.
तांदूळ किंवा रव्याच्या पारंपारिक इडलीऐवजी, तुम्ही नाश्त्यात पौष्टिकतेने समृद्ध नाचणीची इडली खाऊशकता. नाचणी हे ग्लुटेन फ्री धान्य आहे. त्यात भरपूर प्रमाणात फायबर आढळते. नाचणीच्या दररोज सेवनाने तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. शिवाय तुमच्या अंगातील रक्त वाढून हिमोग्लोबिनची असलेली कमतरता दूर होईल.
तुम्ही दररोजच्या नाश्त्यात मूग-दलिया किंवा मूग डाळीचा चिलादेखील खाऊ शकता. याची चव नक्कीच अप्रतिम लागते. त्यात कॅलरीजही कमी आढळतात. यामध्ये फायबरदेखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुळेच तुम्ही हा चविष्ट पदार्थ खाऊन आपले वजन आटोक्यात आणू शकता.
तुम्हाला इतर पदार्थ दररोज नाश्त्यात खाणे शक्य नसेल तर, तुम्ही आपल्या नाश्त्यात मसाला ओट्सचे सेवन करू शकता. वजन कमी करताना ओट्स हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये भरपूर फायबर तसेच अनेक आवश्यक पोषक घटक असतात. महत्वाचं म्हणजे इतर डाएट फूडप्रमाणे हे बेचव लागणार नाही. तुम्हाला त्याची छान चवही मिळेल. त्यामुळे खायचा कंटाळा येणार नाही.
आंबील हा पदार्थ आपल्याकडे आवर्जून पाहायला मिळतो. आंबील नाचण्याच्या पिठापासून बनवले जाते. आंबीलमध्येसुद्धा कमी कॅलरीज आणि पोषक तत्वे जास्त असतात. त्यामुळे तुम्ही नाश्त्यात पारंपरिक आंबीलसुद्धा पिऊ शकता. आंबील च्या नियमित सेवनाने तुमच्या अंगातील रक्तसुद्धा वाढेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)