Weight Loss Tips In Marathi: बदलत्या काळानुसार लोकांच्या जीवनशैलीतसुद्धा प्रचंड बदल झाला आहे. अशातच अनेक लोक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. सध्याच्या धावपळीच्या जगात खानपानाच्या सवयी बदलल्या आहेत. सतत बाहेरचे पदार्थ, जंकफूड, फ्रोजन पदार्थ, कामाच्या पद्धतीत झालेला बदल यासर्वांमुळे वजन वाढण्याची समस्या वाढली आहे. त्यातल्या त्यात अनेकांना पोटावर चरबी वाढवण्याची समस्या सतावत आहे. विशेष म्हणजे शरीराच्या इतर भागांपैकी पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात. आज आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय पाहणार आहोत.
वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत व्यायामासोबतच डाएटही तितकाच महत्वाचा आहे. डाएट अर्थातच आपण काय आणि किती प्रमाणात खातो. तज्ज्ञांच्या मते डाएटमध्ये एका गोष्टीचा समावेश केल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास अत्यंत उपयुक्त ठरेल. या माहितीनुसार आपल्या आहारात जर तुम्ही रताळाचा समावेश केला तर पोटावरची चरबी वेगाने कमी होईल. रताळे हे आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे. यालाच स्वीट पोटॅटो असेदेखील म्हणतात. म्हणून बरेच लोक याच्या नावातच कॅलरी जास्त असल्याचे लक्षात घेऊन ते खात नाहीत. विशेषत: जे लोक वजन कमी करत आहेत ते तर यापासून चार हात लांब राहतात. पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे रताळे वजन कमी करण्याव्यतिरिक्त, मधुमेहाच्या रुग्णांनादेखील फायदेशीर ठरते. परंतु त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.
रिपोर्ट्सनुसार रताळे हे कमी कॅलरी, कमी फॅट आणि विविध पोषक तत्वांनी भरलेले असते. शिवाय त्याच्या सेवनाचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. रताळमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात आणि त्यामुळे लठ्ठपणाही नियंत्रणात राहण्यास मदत होते. रताळ हा एक उच्च फायबरयुक्त पदार्थ आहे. म्हणून ते आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे चांगला आहे. विशेष करून रताळांमुळे पोटावर चरबी जमा होण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे तज्ज्ञांनी हा पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे.
रताळाच्या नियमित आणि योग्य सेवनाने वजन तर कमी होतेच. मात्र पोटाच्या तक्रारीसुद्धा दूर होण्यास मदत होते. रताळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे पचन सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्यासुद्धा नियंत्रणात राहते. महत्वाचं म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास रतळाचा विशेष फायदा होतो.
रताळामध्ये व्हिटॅमिन ए असण्यासोबतच व्हिटॅमिन सी देखील आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळेच रताळाच्या सेवनाने तुमची इम्युनिटी बूस्ट होते. अनेक आजार दूर राहतात. शिवाय त्यात असलेले पोटॅशियम शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे योग्य प्रमाण राखण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.