जलरंग चित्रकला ही व्यक्तीच्या जीवनात तणाव निवारक आणि मूड बूस्टर म्हणून काम करून सर्जनशील क्षमतांमध्ये वाढ करत असल्याचं एका सर्वेमधून आढळून आलं आहे. चित्रकलेच्या माध्यमातून अनेकांचा आत्मविश्वास दुणावला असून संयम आणि कला आणि निसर्गाशी सखोल संबंध वाढल्याचे दिसून आले आहे.
नागपूर स्थित जलरंग कलावंत अभिजित बहादुरे याने या सर्वेचं आयोजन केलं होतं. अभिजित हा मेकॅनिकल इंजिनीअर असून त्याने वॉटर कलर आर्टिस्ट क्षेत्रात करिअर केले आहे. अभिजितने १००० हून अधिक विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवली असून यात डॉक्टर, इंजिनियर, अभियंते, बँकर, आयटी तज्ञांचा समावेश आहे. या कार्यशाळांमध्ये येणारे केवळ चित्रकला शिकण्यासाठीच नव्हे तर आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सक्षम होण्याचादेखील यामागे उद्देश्य असतो. चित्रकलेमुळे आपण तणावमुक्त झालो असून जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी याची मदत झाली असल्याचे मत व्यक्त केले आहे.
चित्रकला ही तणावमुक्त करते. तुम्ही कोणत्याही गोष्टीचे अधिक बारकाईने निरीक्षण करण्याचे शिकता, अशा प्रतिक्रिया या सर्वेमध्ये सामील झालेल्यांनी व्यक्त केले. ‘चित्रकला ही माझी मन आणि हृदयातील सुरक्षित जागा बनली आहे, जिथे मी जगाच्या तणावातून बाहेर पडू शकतो आणि शांतता अनुभवू शकतो’ अशी प्रतिक्रिया एका कलावंताने व्यक्त केली. ‘चित्रकलेमुळे मला निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करण्याची सवय लागली. यापूर्वी मी कधीही एवढे बारकाईने निरीक्षण केले नव्हते’ अशी प्रतिक्रिया आणखी एका कलावंताने सर्वेदरम्यान व्यक्त केली. 'वॉटर कलर पेंटिंग सुरू केल्यापासून माझ्यातील संयम आणि सर्जनशील विचारांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. एकूणच, चित्रकला ही तणाव निवारक आणि मूड बूस्टर म्हणून काम करत असल्याचे या सर्वेमध्ये आढळून आले आहे. चित्रकलेमुळे अनेक नव कलावंतांच्या जलरंग तंत्र आणि सर्जनशील क्षमतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय विद्यार्थी त्यांच्या सभोवतालचे वेगळे निरीक्षण करायला आणि अपूर्णता स्वीकारायला शिकले असल्याचेही दिसून आले आहे.
अभिजित बहादुरे याच्या कामाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा मिळाली आहे. २०२४, २०२३ आणि २०२२ मध्ये जपान इंटरनॅशनल वॉटर कलर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाइन प्रदर्शनांमध्ये अभिजितला गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीने २०२० साली आयोजित केलेल्या राष्ट्रीय ऑनलाइन वॉटर कलर स्पर्धेमध्ये त्याने रौप्य श्रेणी जिंकली होती. त्याची नऊ चित्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारासह भारतीय त्रैमासिक IQ च्या एप्रिल-जून २०२१ अंकात प्रदर्शित करण्यात आली होती.
संबंधित बातम्या