Bacteria: आपण आपल्या शरीराच्या इतर अवयवांच्या तुलनेत आपला चेहरा आणि हात यांच्या स्वच्छतेसाठी त्यांना वारंवार धुत असतो, मात्र उशा आणि उशांची कव्हर बरेचदा बॅक्टेरियाने भरलेली असतात व त्यांच्यामुळे आपल्या त्वचेचे आणि एकूणच स्वास्थ्याचे नुकसान होऊ शकते. अलीकडेच हाती घेतलेल्या एका पाहणीतून असे दिसून आले की, आठवडाभराहून अधिक काळ धुतल्याशिवाय राहून गेलेल्या उशांच्या कव्हरवर टॉयलेट सीट्सच्या १७००० पट अधिक सूक्ष्मजीवजंतू (बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी) असतात. याबद्दल डॉ. स्मृती नासवा सिंग, कन्सल्टन्ट डर्मिटोलॉजिस्ट अँड कॉस्मेटिक डर्मेटोलॉजीस्ट, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड आणि डॉ. कृती सबनीस, इन्फेक्श्यस डिजिज स्पेशलिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल यांच्याकडुन जाणून घेऊयात.
सर्वसाधारण स्वच्छतेच्या ज्या उपाययोजनांकडे आपण सरसकट दुर्लक्ष करतो व त्यातून जंतूसंसर्ग उद्भवू शकतो अशा गोष्टींकडे हे संशोधन भर देते. लहान मुले, वयोवृद्ध तसेच गंभीर आजार असलेल्या व्यक्तींसारख्या रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांच्या बाबतीत तर ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे.
उशीच्या कव्हरप्रमाणेच बिछान्यांवरील चादरीही आठवड्याहून जास्त वेळ न धुता वापरल्या गेल्यास त्यांच्यावर बाथरूममधील डोअननॉबच्या २४००० पट बॅक्टेरिया जमा होतात. खुद्द बिछाने आणि उशाही या बॅक्टेरियांपासून मुक्त राहत नाहीत. वर्षागणिक त्यात बॅक्टेरिया जमा होत राहतात व ७ वर्षांच्या कालावधीत या जागा म्हणजे बॅक्टेरियाची ३ दशलक्ष CFUs ते १६ दशलक्ष CFUs (कॉलनी फॉर्मिंग युनिट्स) चे घर बनतात.
हे सूक्ष्मजीवजंतू एखाद्या सहज आजारी पडणाऱ्या व्यक्तीच्या नाकावाटे शरीरात गेले किंवा त्वचेच्या संपर्कात आले तर त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्वचेवर पुरळ, मुरमं येऊ शकतात, किंवा काहींच्या बाबतीत श्वसनमार्गात जंतूसंसर्ग (न्यूमोनिया) होऊ शकतो. इतकेच नव्हे तर बिछान्यांमध्ये कालांतराने धूळीतील अॅलर्जीकारक घटक साठतात. ओलसर/दमट आणि उष्ण वातावरणामध्ये सूक्ष्मजीवजंतू वेगाने फैलावतात तसेच अशा हवामानामध्ये बुरशी/कवक आणि स्पोअर्स वाढू शकतात. त्वचेच्या मृतपेशींवरही त्यांचे पोषण होते. त्यांच्या मलामुळे अॅलर्जीमुळे येणाऱ्या शिंका, पुरळ, खाज, खोकला, नाक चोंदणे अशा अॅलर्जीजन्य समस्या उद्भवू शकतात.
उष्ण व दमट हवामान
खोलीत चांगले वायूविजन नसल्यास
खोलीत पुरेसा सूर्यप्रकाश येत नसल्यास
बिछान्यावर लघवी (लहान बाळांची), पाणी किंवा एखाद्या पेयासारखा द्रवपदार्थ किंवा खाद्यपदार्थ सांडला असल्यास
खूप घाम येत असल्यास
मेकअप न काढता बिछान्यावर झोपल्यास
हॉस्टेलमध्ये किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलांकेड सर्वसाधारणे स्वच्छ बिछाना/चादरींची सोय नसते.
पाळीव प्राण्यांच्या अंगावरील तंतू बिछान्यावर राहून गेले व ते वरचेवर स्वच्छ न केल्यास
बिछान्यांमध्ये बॅक्टेरिया, अॅलर्जीकारक जंतू, कवक/बुरशी जमू नये यासाठी काय करावे?
ज्यांना खूप जास्त घाम येतो किंवा जे रात्रीचा व्यायाम करतात अशा मंडळींनी बिछान्यात पडण्याआधी आंघोळ करावी.
झोपण्यापूर्वी मेकअप काढायला विसरू नये. याचा दुहेरी फायदा आहे – एक तुमची त्वचेला श्वास घेण्याची मोकळीक मिळते व मेकअपसहित झोपल्यामुळे त्वचेवर येणारी मुरमं आणि पुरळ यांचा प्रतिबंध होतो – दुसरा फायदा म्हणजे उशा व उशांच्या अभ्र्यांवर बॅक्टेरियाचा संसर्ग होणे टाळले जाते.
प्रत्येक वर्षी उशा आणि उशांचे कव्हर बदलावेत आणि बिछाना दर सात वर्षांनी बदलावा
घरात बाळ असेल त्याचे टॉयलेट ट्रेनिंग होईपर्यंत तर बिछान्यावर मेणकापडासारखे आच्छादन घालावे म्हणजे द्रवपदार्थ बिछान्यात झिरपणार नाही.
बिछान्यावर खाणे किंवा पिणे टाळावे किंवा खाण्यापूर्वी बिछान्यावर एखादे प्लास्टिक पसरावे
डेस्कवरून काम करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे शरीराची ढब नीट राखली जाईल व पाठदुखी होणार नाही हे तर झालेच, पण त्याचबरोबर बिछान्यावरही घाम लागणे टाळले जाईल.
दर काही दिवसांनी बिछान्यांवरील आवरण काढून त्यांना उन्हात आणि हवेशीर ठिकाणी ठेवा.
बिछान्यावर काहीतर सांडल्यास बिछाना सुकविण्याचा प्रयत्न करा
उशांचे अभ्रे आणि चादरी दर आठवड्याला धुवून टाका
रात्री खूप घाम येत असेल किंवा तुम्हाला झोपताना केसांना व त्वचेला तेल लावण्याची सवय असेल तर चादरी-अभ्र्यांची स्वच्छता वरचेवर करा
अशाप्रकारे छोट्या छोट्या उपाययोजना केल्यास व निरोगी सवयी लावून घेतल्यास आपण एका स्वच्छ आणि जंतूपासून मुक्त वातावरणामध्ये झोपेचा अनुभव घेऊ शकू.