Tooth Pain home remedies: आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाला दातदुखीच्या समस्येचा सामना करावा लागतो. आणि अचानक उद्भवलेल्या दातदुखीमुळे खूप त्रास होतो. कारण, या काळात काहीही खाणे किंवा पिणे कठीण होते. दातदुखीमुळे काही वेळा चेहऱ्यावर सूजही येते. विशेषत: लहान मुलांना दातदुखीचा खूप त्रास होतो. कारण, सतत गोड खाणे, दात घासताना निष्काळजीपणा, लहान मुलांच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होणे ही एक सामान्य समस्या आहे. मात्र, अनेक कारणांमुळे मोठ्यांच्या दातांमध्ये देखील पोकळीची समस्या देखील उद्भवते आणि त्यामुळे वेदना होतात.
दातदुखी सुरू झाली की, ती टाळण्यासाठी लोकांना फक्त वेदनाशामक औषधं घ्यायची असतात किंवा लगेच डॉक्टरकडे जायचे असते, जेणेकरून त्यांना दुखण्यापासून आराम मिळेल. पण, अचानक दातदुखीचा त्रास होतो तेव्हा काय करावे, असा मोठा प्रश्न उद्भवतो. अशा परिस्थितीत घरातील किचनमध्ये ठेवलेल्या काही गोष्टी तुम्हाला या दात दुखीपासून आराम देऊ शकतात.
दातदुखी किंवा कॅव्हिटी दातांच्या स्वच्छतेच्या अभावामुळे होऊ शकते. याशिवाय जास्त गोड खाणे आणि कॅल्शियमची कमतरता यामुळेही दातदुखी होऊ शकते. आता आपण जाणून घेऊया दातदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात.
दातदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी पाण्यात सैंधव मीठ घालून ते गरम करा. हे कोमट पाणी तोंडात काही वेळ दुखणाऱ्या भागात ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. ही प्रक्रिया चार ते पाच वेळा करा. जर, सैंधव मीठ उपलब्ध नसेल तर, तुम्ही पांढऱ्या मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता. यामुळे तुम्हाला वेदना तसेच सूज यापासून आराम मिळतो.
मीठाव्यतिरिक्त तुमच्या घरात तुरटी असेल, तर ती गरम पाण्यात मिसळून गुळण्या केल्याने दातदुखीपासून लगेच आराम मिळतो. याशिवाय तोंडात येणाऱ्या फोडांपासून आराम मिळवून देण्यासाठी तुरटी प्रभावी आहे.
लवंग बहुतेक भारतीयांच्या स्वयंपाकघरात किंवा पूजा घरात आढळते. लवंगमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे तुम्हाला दातदुखीपासून आराम मिळू शकतो. यासाठी लवंग बारीक करून पावडर बनवून दाताखाली दाबून ठेवा. घरामध्ये लवंगाचे तेल असेल, तर त्यात कापूस बुडवून दुखऱ्या भागावर ठेवा.
दातदुखीमुळे गालांवर सूज वाढली असेल, तर कोल्ड कॉम्प्रेसमुळे खूप आराम मिळतो. यासाठी एका कपड्यात बर्फाचा तुकडा घेऊन तो दुखऱ्या भागावर लावा किंवा तुम्ही आईस पॅकही घेऊ शकता. यामुळे तुम्हाला सूज, तसेच दुखण्यापासून आराम मिळतो.
संबंधित बातम्या