Tips to Avoid Skin and Vaginal Infection in Monsoon: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दुषित पाणी, विषाणु, तसेच जंतूचा त्वचेशी थेट संपर्क येऊन अनेक त्वचाविकार यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय पावसाळ्यात योनीत संसर्ग होण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये आपण आपल्या त्वचेची आणि योनीमार्गात संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं असते.
मुंबईतील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे म्हणाल्या की, पावसाचे पाणी हवेतील प्रदूषकांमध्ये मिसळते. त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात आणि त्वचेला खाज सुटते. पावसामुळे बुरशीचे प्रमाण वाढते आणि कीटकांची पैदास होते. ज्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. जसे की त्वचेची जळजळ, लालसरपणा, मुरुम, त्वचेचा संसर्ग, पुरळ, बुरशीजन्य संसर्ग आणि चेहऱ्यावरील फॉलिक्युलायटिस. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे.
पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी भरपूर पाणी प्या. तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळा. त्वचेवर मॉइश्चरायझर वापरणे महत्वाचे आहे. नितळ त्वचेसाठी स्वत: कोणतीही उत्पादने वापरू नका. त्वचेचा संसर्ग असल्याचे जाणवल्यास तातडीने त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता लाडगुडी म्हणाल्या की, योनिमार्गाचा संसर्ग हा योनीतील यीस्टचा संसर्ग ज्याला कँडिडल व्हल्व्होव्हॅजिनायटिस म्हणून ओळखले जाते. हा एक प्रकारचा संसर्ग आहे जो कँडिडा बुरशी संसर्गामुळे होतो. यामुळे स्त्रीच्या जननेंद्रीयामध्ये अस्वस्थता निर्माण होऊन जळजळ होऊ लागते. प्रत्येक स्त्रीला आयुष्यात एकदा तरी योनिमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. वातावरणातील आर्द्रता आणि ओलसरपणामुळे पावसाळ्यात यीस्ट इन्फेक्शन, बॅक्टेरिअल वेजिनोसिस, क्लॅमिडीया, युटीआय आणि गोनोरिया होण्याची शक्यता वाढते. वाढलेली आर्द्रता आणि दमटपणा ही बुरशी आणि जीवाणूंच्या प्रजननासाठी पोषक ठरते. योग्य स्वच्छता न पाळल्याने किंवा जास्त घाम येणे यामुळे संवेदनशीलता आणि जळजळ वाढू शकते. खाज सुटणे, सूज येणे, लालसरपणा, पुरळ उठणे, लघवी करताना जळजळ होणे, योनीवाटे पांढरा स्त्राव बाहेर येणे, दुर्गंधी येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळेच पावसाळ्यात योनीमार्गाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
पावसाळ्यात योनीमार्गात संसर्ग टाळण्यासाठी सुती अंडरवेअरची निवड करावी. ही अंडरवेअर एक दिवसापेक्षा जास्त काळ न धुता वापरणे टाळा. कारण ते तुमच्या योनीमार्गाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. मासिक पाळी दरम्यान चांगली स्वच्छता राखणे महत्वाचे आहे, विशेषतः पावसाळ्यात ओलावा वाढल्यामुळे योनिमार्गात संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते आणि पुरळ उठणे, खाज सुटणे आणि जळजळ होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. म्हणूनच महिलांना किमान ६ ते ७ तासांनंतर सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पन्स बदलण्याचा सल्ला दिला जातो.
योनिमार्गाचे आरोग्य राखण्यासाठी आणि बॅक्टेरिया आणि बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी योनीमार्ग हा हळूवारपणे कोमट पाण्याने वारंवार स्वच्छ करा. अंगावर जास्त वेळ भिजलेले कपडे ठेवू नका. योनी स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करा. याकरिता अति गरम पाण्याचा वापर करु नका. कारण त्यामुळे तुमची संवेदनशील त्वचेची जळजळ होऊ शकते आणि तुमच्या पीएच पातळी वाढू शकते. रासायनिक उत्पादनांचा वापर टाळा. कारण त्यामुळे योनीमार्गात पुरळ येऊ शकतात, असेही डॉ. श्वेता म्हणाल्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या