Thyroid Problem: थायरॉईड विकार ठरतोय सायलेंट किलर, कशी काळजी घ्यावी सांगतायत तज्ञ
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thyroid Problem: थायरॉईड विकार ठरतोय सायलेंट किलर, कशी काळजी घ्यावी सांगतायत तज्ञ

Thyroid Problem: थायरॉईड विकार ठरतोय सायलेंट किलर, कशी काळजी घ्यावी सांगतायत तज्ञ

Feb 08, 2024 08:15 PM IST

Health Care Tips: आजकाल बऱ्याच महिलांना थायरॉईडची समस्या असलेली पहायला मिळते. यामुळे इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.

थायरॉईड
थायरॉईड

Thyroid Becoming Silent Killer: आपल्या गळ्यात असणार्‍या स्वरयंत्राच्या मागे एक फुलपाखरासारखी ग्रंथी असते. ती म्हणजे थायरॉइड होय. थायरॉईड विकारांबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत असल्याने त्याला सायलेंट किलर म्हणूनही ओळखले जाते. थायरॉईडबाबत लीलावती हॉस्पिटल येथील मधुमेह आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ विजय पणीकर यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत सांगितले आहे.

न पाहिलेला ऑर्केस्ट्रेटर : थायरॉईड ग्रंथी

थायरॉईड ग्रंथी नाजूक फुलपाखरासारखी दिसत असली तरी शरीराची वाढ, मेंदूचे कार्य, प्रजनन संस्थेचे संतुलन आणि एकूणच चयापचयाच्या क्रियेचे नियमन ही अत्यंत महत्त्वाची कामे या थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोनच्या कार्यावर परिणाम करतात. २०२१ मध्ये संपूर्ण भारतात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, सुमारे ७.३ टक्के प्रतिसादकर्त्यांना थायरॉईडशी संबंधित समस्या होत्या. परंतु थायरॉईड विकार असलेले अंदाजे ५० टक्के लोक त्यांच्या या स्थितीबाबत अनभिज्ञ असतात. थायरॉईडच्या समस्यांमुळे एखाद्या व्यक्तीच्या संपुर्ण आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होतो.

लैंगीक विषमता

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे थायरॉईड विकारांचा त्रास सहसा स्त्रियांना सहन करावा लागतो. पुरुषांपेक्षा पाच ते आठ पटीने जास्त महिलांना या समस्यांना सामोरे जावे लागते.

धोक्याची चिन्हे ओळखा

थायरॉईड विकार वेगवेगळ्या प्रकारे आढळून येतात. हे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही प्रभावित करतात. वजनातील चढ-उतार, मासिक पाळीच्या समस्या, वंध्यत्व, लैंगीक क्षमता कमी होणे, थकवा, ब्रेन फॅाग, नैराश्य आणि चिंता यासारखी लक्षणे आढळून येतात. ही धोक्याची चिन्हे दिसून येताच वैद्यकीय सल्ला घेणे योग्य असते.

नियमित तपासणी आणि चाचणी महत्त्वाची

इतर आजारांच्या तपासणी प्रमाणेच थायरॉईड सारख्या आजाराची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. यामुळे थायरॉईड विकारांची प्रगती आणि त्यांच्या संभाव्य गुंतागुंतांना प्रतिबंधित करून वेळीच निदान केले जाते.

योग्य जीवनशैलीची निवड

चांगल्या आरोग्य सवयी तसेच योग्य जीवनशैलीची निवड थायरॉईड संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असा संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणावाचे व्यवस्थापन आणि वजन नियंत्रित राखणे या सर्वांचा संपुर्ण आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान ठरतो. थायरॉईड कार्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मानसिक आरोग्य आणि थायरॉईड विकार

थायरॉईड ग्रंथीचे निदान न झालेल्या स्थितींमुळे अनेकदा नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी शारीरिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. थायरॉईड विकार समजून घेणे आणि त्यावर उपाय करणे हे सर्वांगीण आरोग्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner