मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eye Care: मायोपियाग्रस्त रुग्णांत काचबिंदू होण्याचा धोका तीन पट अधिक? जाणून घ्या सविस्तर

Eye Care: मायोपियाग्रस्त रुग्णांत काचबिंदू होण्याचा धोका तीन पट अधिक? जाणून घ्या सविस्तर

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 23, 2024 11:03 PM IST

Glaucoma and Myopia: ग्लुकोमा अथवा काचबिंदूचा त्रास सुरू होण्यामागे डोळ्यांवर आलेला ताण अधिक जबाबदार असतो.

Eye Care Tips
Eye Care Tips (freepik)

Risk of glaucoma in myopic patients: ज्या व्यक्तिंना अल्प अथवा तीव्र स्वरुपाच्या मायोपिया विकाराचा सामना करावा लागतो, त्यांना जीवनात ग्लुकोमा होण्याचा धोका तीन पट अधिक असतो, ज्यामध्ये डोळ्यांची स्थिती तीव्रपणे बिघडू शकते. सध्या मुंबई येथे डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या वतीने ग्लुकोमा जागरूकता महिना सुरू असून त्यात सहभागी झालेल्या डॉक्टरांनी मायोपिया विकाराशी संबंधित वास्तव अधोरेखित केले.

मायोपिया आणि ग्लुकोमा यांच्यातील परस्पर संबंधावर बोलताना मुंबई येथील डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या ग्लुकोमा कन्सलटंट डॉ. निधी ज्योती शेट्टी म्हणाल्या, “डोळ्यांमधील ऊतींच्या संरचनेत बदल झाल्यामुळे मायोपिक डोळ्यांमधील ऑप्टिक नर्व्ह हेड ग्लुकोमासाठी अधिक संवेदनाक्षम असू शकते. मायोपिक डोळ्यांमधील दृष्टिपटलातील मज्जातंतूच्या थराची जाडी घटल्याने देखील वाढीव धोका होऊ शकतो. एका नामांकित अभ्यासानुसार प्राथमिक स्वरुपात ओपन-अँगल ग्लुकोमा (पीओएजी) आणि मायोपिया यांच्यात मजबूत परस्पर संबंध आढळला. ज्यामध्ये मायोपियाचे प्रमाण कमी स्वरूपात असलेल्या डोळ्यांमध्ये २.३ आणि मध्यम ते उच्च मायोपिया असलेल्या डोळ्यांमध्ये ३.३ च्या ऑड्स रेशियोसह मायोपिक ग्लुकोमा बळावण्याचा धोका लवकर सुरू होतो, तसेच सेंट्रल व्हिजन डिफेक्ट (मध्यवर्ती दृष्टीदोष) लवकर विकसीत होण्याशी संबंधित असू शकतो.”

ग्लुकोमा अथवा काचबिंदूचा त्रास सुरू होण्यामागे डोळ्यांवर आलेला ताण अधिक जबाबदार असतो. डोळ्यांमधील स्त्राव वाहून नेणाऱ्या रचनेत (ड्रेनेज सिस्टीम) बिघाड झाल्यास आतल्या-आत स्त्राव तयार होऊन, निर्माण होणारा अतिरिक्त ताण हा ऑप्टिक नर्व्हला नुकसान पोहोचवतो, ज्यामुळे दृष्टी कमजोर बनते. भारतीयांमध्ये काचबिंदूचे प्रमाण अंदाजे २.७-४.३% दरम्यान आहे. जवळपास १.२ दशलक्ष लोकांमध्ये अंधत्वासाठी हे कारण जबाबदार असून एकूण ५.५% दृष्टिहिनत्वाला जबाबदार ठरते. ज्यामुळे ते भारतातील अपरिवर्तनीय अंधत्व म्हणजेच इर्रिव्हसीबल ब्लाइंडनेसच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. दुसरीकडे, देशातील ५ ते १५ वर्षांच्या शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण १९९९ मध्ये ४.४% होते, जे २०१९ मध्ये २१.१% पर्यंत वाढले आहे. याचा प्रसार २०३० मध्ये ३१.८%, २०४० मध्ये ४०% आणि २०५० मध्ये ४८.१% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने लहान मुले आणि कामकरी वर्गात हा विकार वाढल्याचे आढळते.

ग्लुकोमा आणि मायोपियासारख्या विकारांत थोडी काळजी घ्यावी लागते. डॉ. निधी ज्योती शेट्टी म्हणाल्या: मायोपियाग्रस्त व्यक्तिंनी ग्लुकोमापासून सुटका व्हावी किंवा त्याचा त्रास पुढे ढकलण्यासाठी आरोग्यदायक जीवनशैलीचा अंगीकार करावा, प्रामुख्याने आहार आणि व्यायाम डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे करावे. शिवाय, त्याचप्रमाणे विकाराचे निदान झाल्यास नियमितपणे फॉलो-अप घ्यावा, आणि स्थिती अधिक हाताबाहेर जाऊ नये म्हणून वेळोवेळी तपासण्या करणे रास्त ठरेल.”

त्या पुढे माहिती देतात: “ज्या रुग्णाला हाय-मायोपियाचा त्रास असेल, त्याला वर्षातून एकदा फॉलो-अप करण्याचा सल्ला दिला जातो. डोळ्यांच्या पडद्यावरील कोणत्याही आजाराचे किंवा ग्लुकोमा/काचबिंदूचे निदान झाल्यास, फॉलो-अपचा हा कालावधी दर तीन महिन्यांनी किंवा अगदी दर महिन्यावर येऊ शकतो. ग्लुकोमा हा एक आजार आहे, ज्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोणतेही लक्षण दिसून येत नाही. त्यामुळे रुग्णाने वारंवार डोकेदुखी किंवा अर्धशिशीचे झटके किंवा परिधीय दृष्टीतील बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.”

 

WhatsApp channel

विभाग