Daily Habits That Affects Fertility: अनेक लोक त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होणाऱ्या परिणामाकडे दुर्लक्ष करतात. या सवयी हळूहळू प्रजनन क्षमता कमी करू शकतात, ज्यामुळे कपलसाठी गर्भधारणेपर्यंतचा प्रवास तणावपूर्ण ठरतो. प्रत्येक जण हा आनंद सहजपणे अनुभवू शकत नाही. काही जोडप्यांना शुक्राणूंची संख्या कमी होणे, अंडकोषातील शिरा सुजणे, पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन आणि महिलांमधील फॅलोपियन ट्यूब आणि गर्भाशयाच्या समस्या, एंडोमेट्रिओसिस, हार्मोनल असंतुलन, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स सारख्या अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमच्या प्रजनन क्षमतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी आवश्यक पाऊल उचलत आणि योग्य ती सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मुंबई येथील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या प्रजनन सल्लागार डॉ. रितू हिंदुजा यांनी कोणत्या सवयी प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात हे सांगितले आहे.
प्रक्रिया केलेले आणि पॅकेज फुड जास्त प्रमाणात खाणे तुमच्या प्रजनन क्षमतेला बाधा आणू शकते. या पदार्थांमध्ये सोडियम, साखर, अनसॅच्युरेटेड फॅट्स, ॲडिटीव्ह आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या हार्मोन्समध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. हार्मोनल असंतुलन शुक्राणू उत्पादन आणि ओव्हुलेशनमध्ये समस्या निर्माण करू शकते. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि निरोगी चरबी यांसारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरता असते. यामुळे प्रजननासंबंधीत पेशी आणि ऊतींचे नुकसान होते. चिप्स, चॉकलेट्स, कपकेक, पिझ्झा, पास्ता, नूडल्स, पाणीपुरी, आलू टिक्की आणि फ्रेंच फ्राईजसारखे जंक फूड खाणे टाळा.
व्यस्त जीवनशैलीमुळे तणाव वाढू शकतो. दीर्घकालीन ताण हा तुमच्या एकुण आरोग्यावर तसेच प्रजनन क्षमतेवर परिणाम करतो. हे स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकते. परिणामी मासिक पाळी अनियमित होते. कॉर्टिसॉल सारखे तणावास कारणीभूत हार्मोन रक्तदाब पातळी नियंत्रित करणे, चयापचय प्रक्रिया आणि जळजळ कमी करणे यासारख्या कार्यासाठी जबाबदार असतात, ते तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. शुक्राणूंची निर्मिती आणि ओव्हुलेशन कमी करून पुरुष आणि स्त्रिया दोघांवरही याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून, तणावाचे व्यवस्थापन करणे, वर्क लाइफ बॅलेन्स करणे आवश्यक आहे. ध्यान किंवा ब्रीदिंग एक्सरसाइज यांसारख्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात.
निरोगी जीवनशैली राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम किंवा शारीरिक हालचाली महत्त्वाच्या आहेत. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहणे किंवा पुरेशी हालचाल न केल्याने लठ्ठपणा आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमच्या प्रजनन क्षमतेचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. जिम, वेट ट्रेनिंग, योग, ध्यान, पोहणे, धावणे किंवा बास्केटबॉल खेळणे यासारख्या क्रियांद्वारे दिवसातून ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ सक्रिय राहणे गरजेचे आहे. हे तुमची शारीरीक क्षमता, ऊर्जा पातळी आणि प्रजनन आरोग्य सुधारु शकते.
धूम्रपान, सेकंड हॅड स्मोकींग आणि मद्यपान तसेच तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन पुरुष आणि महिला या दोघांच्याही प्रजनन प्रणालीवर परिणाम करते. टार, आर्सेनिक आणि निकोटीन यांसारख्या सिगारेटमध्ये असलेले हानिकारक विषारी पदार्थ शुक्राणू आणि स्त्रीबीज निर्मितीमध्ये व्यत्यय आणते व प्रजनन आरोग्यावर परिणाम करते. व्यसनांमुळे शुक्राणू आणि अंड्यांची गुणवत्ता आणि संख्या कमी होते आणि गर्भाधारण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. अल्कोहोलमुळे शुक्राणूंची खराब गुणवत्ता, कामवासना कमी होणे आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊन प्रजनन समस्या उद्भवू शकतात.
मोबाईल गॅझेट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर दीर्घकाळ वेळ घालवण्यामुळे बैठी जीवनशैली वाढू शकते. ज्यामुळे लठ्ठपणा आणि हार्मोनल असंतुलनची समस्या उद्भवू शकते. याचा प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. याव्यतिरिक्त, जास्त स्क्रीन टाईममुळे तणावाची पातळी वाढू शकते आणि झोपेची गुणवत्ता खालावू शकते, जे प्रजनन आरोग्यावर दुष्परिणाम करतात.
वायफाय आणि ब्लूटूथ उपकरणांच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा प्रजनन क्षमतेवर होणारा संभाव्य परिणाम हा चिंतेचा विषय ठरत आहे. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (EMFs) च्या दीर्घकाळापर्यंत संपर्कामुळे पुरुषांमधील शुक्राणूंच्या गुणवत्तेवर आणि गतिशीलतेवर तसेच स्त्रियांमध्ये स्त्रीबीजाचा कार्यावर परिणाम होऊ शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)