मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Boost Immunity: बदलत्या हवामानात आजारांपासून दूर राहण्यासाठी बूस्ट करा इम्युनिटी, उपयुक्त आहेत हे २ ड्रिंक्स

Boost Immunity: बदलत्या हवामानात आजारांपासून दूर राहण्यासाठी बूस्ट करा इम्युनिटी, उपयुक्त आहेत हे २ ड्रिंक्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 06, 2024 07:05 PM IST

Drinks for Immunity: बदलत्या हवामानात सर्दी आणि खोकल्याचा त्रास होणे सामान्य आहे. मात्र तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असल्यास या समस्या टाळता येऊ शकतात. घरी इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्स कसे बनवायचे ते जाणून घ्या.

इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्स
इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्स (unsplash)

Immunity Boosting Drinks: थंडीनंतर बदलत्या हवामानाने दिलासा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीने सर्व जण हैराण झाले होते. थंडी अजून गेली नसली तरी दिवसा कडक ऊन आणि सकाळ-संध्याकाळ हवेतील थंडावा यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात. या काळात रोगांचा सर्वाधिक धोका असतो. विशेषत: ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. अशा परिस्थितीत आजारांपासून दूर राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करणे. येथे २ प्रकारचे इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्स आहेत, जे तुम्ही पटकन तयार करू शकता. पाहा हे कसे तयार करावे.

१. आले आणि आवळाचे बनवा ड्रिंक

हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- २ मोठे तुकडे आले

- ७ ते ८ आवळा

- २ तुकडे कच्ची हळद

- ३-४ लिंबू

- काळी मिरी

- मध

- पाणी

कसे बनवावे

हे ड्रिंक बनवण्यासाठी प्रथम आले, आवळा, हळद आणि लिंबू धुवून घ्या. नंतर आले आणि हळद यांची साल काढा आणि किसून घ्या. नंतर काळी मिरी चांगली ठेचून घ्या. आता एका भांड्यात पाणी गरम करून त्यात ठेचलेली काळी मिरी घाला. नंतर त्यात किसलेली हळद आणि आले घाला. आता २० मिनिटे उकळू द्या. आवळा बारीक चिरून घ्या आणि नंतर थोडे पाणी घालून ब्लेंड करा. आवळा गाळून घ्या आणि बाजूला ठेवा. आता पाण्याला उकळी आली की थंड होऊ द्या. नंतर या हळदीच्या पाण्यात लिंबू घाला आणि आवळा रस देखील घाला. हे एका कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. पिण्यासाठी हे ज्यूस एका कपमध्ये घ्या आणि त्यात मध मिसळून प्या.

२. संत्री आणि आल्यापासून बनवा शॉट्स

हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- २ संत्र

- २ लिंबू

- १०० ग्रॅम ताजे आले

- १/२ टीस्पून हळद

- १/८ टीस्पून काळी मिरी

- २ कप पाणी

 

कसे बनवायचे

हे बनवण्यासाठी संत्री आणि लिंबू सोलून त्यांचे छोटे तुकडे करा. नंतर आले नीट धुवून त्याचे तुकडे करा. सर्व काही ब्लेंडरमध्ये ठेवा आणि गुळगुळीत होईपर्यंत ब्लेंड करा. आता चाळणीने हे गाळून एका मोठ्या भांड्यात ठेवा. रस गाळण्यास मदत करण्यासाठी चमचा वापरा. हा रस फ्रिजमध्ये ठेवा आणि रोज प्या. शक्यतो जास्त दिवस साठवू नाक. नेहमी फ्रेश ड्रिंक बनवण्याचा प्रयत्न करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel