Brain Hemorrhage : तरुणांमध्ये वाढतेय ब्रेन हॅमरेजची समस्या, नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या...
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Brain Hemorrhage : तरुणांमध्ये वाढतेय ब्रेन हॅमरेजची समस्या, नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या...

Brain Hemorrhage : तरुणांमध्ये वाढतेय ब्रेन हॅमरेजची समस्या, नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या...

Published Feb 08, 2025 04:18 PM IST

Brain Hemorrhage Reasons In Young Age : तरुणांमध्ये मेंदूच्या रक्तस्त्रावाचे प्रमाण का वाढत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. तरुणांमधील मेंदूचा रक्तस्त्राव हा एक चिंतेचा विषय ठरत आहे.

तरुणांमध्ये वाढतेय ब्रेन हॅमरेजची समस्या, नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या...
तरुणांमध्ये वाढतेय ब्रेन हॅमरेजची समस्या, नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या...

Brain Hemorrhage Reasons : मेंदूतील रक्तस्त्राव, ज्याला इंट्राक्रॅनियल रक्तस्त्राव असेही म्हणतात, ही एक जीवघेणी वैद्यकिय स्थिती आहे. यामध्ये मेंदूमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला रक्तस्त्राव होतो. रक्तवाहिन्या फुटल्याने हा दाब वाढतो आणि मेंदूचे नुकसान होते. केवळ प्रौढांमध्ये किंवा ज्येष्ठांमध्येच नाही, तर २५ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये देखील ही समस्या आढळून येते. तरुणांमध्ये मेंदूतील रक्तस्त्राव होण्यास कारणीभूत घटक म्हणजे उच्च रक्तदाब, डोक्याला झालेली दुखापत (पडणे, वाहन चालविताना झालेला अपघात, खेळताना झालेली दुखापत), एन्युरिझम (रक्तवाहिन्या कमकुवत होणे), मेंदूतील ट्यूमर, रक्त गोठण्याचे विकार आणि स्ट्रोक हे आहेत, असे न्यूरोसर्जन डॉ. हरीश नाईक सांगतात.

काय आहेत लक्षणे?

ब्रेन हॅमरेजच्या सामान्य लक्षणांमध्ये अचानक तीव्र डोकेदुखी होणे, मळमळणे आणि उलट्या होणे, प्रकाशाची संवेदनशीलता जाणवणे, मान ताठ होणे, झटके येणे, हात आणि पाय कमकुवत होणे, मुंग्या येणे किंवा बधीर होणे, गिळण्यास असमर्थता, श्वास घेण्यास त्रास होणे, मोटर कौशल्ये कमी होणे, दम लागणे, हात थरथरणे, शारीरीक संतुलन बिघडणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, दृष्टी दोष, शरीराच्या एका बाजूचा कमकुवतपणा, बोलण्यास अडथळे येणे आणि चेतना कमी होणे यांचा समावेश आहे. जर त्वरित उपचार केले नाहीत तर यामुळे दीर्घकालीन अपंगत्व, मेंदूचे कार्य पूर्णपणे बंद होणे किंवा मृत्यू देखील ओढावू शकतो.

तरुणांमध्ये का वाढतोय ब्रेन हॅमरेज?

तरुणांमध्ये मेंदूच्या रक्तस्त्रावाचे प्रमाण का वाढत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. तरुणांमधील मेंदूचा रक्तस्त्राव हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. दुर्दैवाने आहाराच्या चुकीच्या सवयी, जेवणात मीठाचे प्रमाण अधिक असणे आणि शारीरिक हालचालींच्या अभाव, अनियंत्रित उच्च रक्तदाबाचे प्रमाण यामुळे मेंदूतील रक्तस्त्राव च्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शिवाय, ताणतणावामुळे देखील रक्तदाब वाढतो आणि कालांतराने रक्तवाहिन्या कमकुवत झाल्याने मेंदूत रक्तस्त्राव होतो. धूम्रपान, दारू, एनर्जी ड्रिंकचे सेवन आणि मादक पदार्थांचे सेवन यामुळे रक्तवहिन्यांचे आरोग्य बिघडते आणि मेंदूतील रक्तस्त्रावाची शक्यता वाढते. हल्ली तरुणाईमधील अति व्यायामाच्या ट्रेंड पाहता आणि कार्यक्षमता वाढवणाऱ्या पदार्थांचा वापरही आरोग्यास घातक ठरतो. तसेच, डोक्याला दुखापत करणारे अपघात, मेंदूतील ट्यूमर, स्ट्रोक, एन्युरिझम (रक्तवाहिन्या कमकुवत होणे) आणि अगदी निदान न झालेले जन्मजात आजार जसे की, धमन्यांमधील विकृती (AVM) ही मेंदूतील रक्तस्त्रावाची संभाव्य कारणे आहेत. सीटी स्कॅन आणि एमआरआय हे मेंदूतील अंतर्गत रक्तस्त्राव ओळखण्यास मदत करतात.

Fitness Tips: व्यायामानंतर स्ट्रेचिंग करणे आहे अत्यंत महत्वाचे, जाणून घ्याचे त्याचे महत्व आणि फायदे

काय आहेत उपचार?

मेंदूतील रक्तस्त्राव ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे आणि वेळीच उपचार केल्याने रूग्णाचा जीव वाचण्याची शक्यता वाढते. वेळीच उपचाराने भविष्यातील गुंतागुंत आणि कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता कमी करता येते. अचानक अशक्तपणा जाणवणे, अस्पष्ट बोलणे आणि तीव्र डोकेदुखी यासारखी लक्षणे वेळीच ओळखून वैद्यकिय सल्ला घेणे गरजेचे आहे. मेंदूतील रक्तस्त्रावाच्या तात्काळ उपचारांमध्ये रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी औषधं, दाब कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया (क्रॅनियोटॉमी) आणि दीर्घकालीन समस्या तसेच, अपंगत्व टाळण्यासाठी रिहॅबिलेशन थेरेपी फायदेशीर ठरते.

हे लक्षात असू द्या!

लक्षणांबद्दल जागरूकता पसरवणे, निरोगी जीवनशैलीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, नियमित आरोग्य तपासणी करणे यामुळे मेंदूतील रक्तस्त्राव रोखण्यास मदत होईल. शिवाय, तरुणांनी त्यांच्या रक्तदाबाचे निरीक्षण करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे, तणावाचे व्यवस्थापन करणे, धूम्रपान तसेच मद्यपान टाळणे आणि रक्त गोठण्याच्या कोणत्याही विकारांवर त्वरीत उपचार घेणे गरजेचे आहे. दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर करणे किंवा मैदानी खेळादरम्यान डोक्याला दुखापत होणार नाही याकरिता आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner