History of Teacher's Day: भारतात 'शिक्षक दिन' ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. तर 'जागतिक शिक्षक दिन' एका महिन्यानंतर म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. शिक्षक दिनाला सर्वजण आपल्या आवडत्या शिक्षकांना शुभेच्छा देतात, गिफ्ट्स देतात त्यांना आदरपूर्वक संदेश पाठवतात. होईल त्यापरीने त्यांचा दिवस खास बनवण्याचा प्रयत्न करतात. परंतु भारतात ५ सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा केला जातो? या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व काय आहे? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. ते एक महान तत्त्वज्ञ आणि विद्वान होते. १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि १९६३ मध्ये त्यांना ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व देण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी येथे झाला. एक प्रसिद्ध शिक्षक, डॉ. राधाकृष्णन यांनी कोलकत्ता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले होते. ते एक चांगले लेखकसुद्धा होते आणि त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील व्याख्यानांमधून आंतरसांस्कृतिक समज वाढविण्यास योगदान दिले होते.
राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून कसा साजरा होऊ लागला. याची कथा त्यांच्या नम्रतेचा आणि शिक्षकी कामाविषयीच्या आदराचा पुरावा आहे. डॉ. राधाकृष्णन १९६२ मध्ये भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा काही विद्यार्थी त्यांना भेटायला आले. आणि त्यांनी 5 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली. मात्र, विद्यार्थ्यांनी हा दिवस शिक्षकांना समर्पित करावा, अशी सूचना त्यांनी केली. अशा प्रकारे ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. अशाप्रकारे ते किती सुंदर व्यक्तिमत्व होते हे सिद्ध होते.
भारतीय संस्कृती गुरू आणि शिष्य यांच्यातील नातेसंबंधांना खूप महत्त्व देते. ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन केवळ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करत नाही, तर शिक्षकांच्या समर्पण आणि मेहनतीचाही सन्मान करतो. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी त्यांची कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करण्याची संधी मिळते. तर शिक्षकांना आत्मनिरीक्षण करण्याची आणि विद्यार्थ्यांसाठी निरोगी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्याची संधी मिळते. अशाप्रकारे शिक्षक दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे.