Tasty Curd sandwich recipe: अलीकडच्या काळात लाइफस्टाइलमध्ये प्रचंड बदल झाला आहे. त्यानुसार खानपानाच्या सवयीसुद्धा बदलल्या आहेत. आजकालची मुले बाजारात मिळणारे पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. मुले घरी बनवलेले पदार्थ खायला दिल्यावर नाकसुद्धा मुरडतात. अशा परिस्थितीत प्रत्येक आईला आपल्या मुलाला काय खायला द्यायचे हा प्रश्न भेडसावत असतो जेणेकरून तो त्याला आवडेल आणि पोटही भरेल.
खासकरून दुपारच्या वेळी हलकेफुलके आणि झटपट बनवून काय खायला द्यावे याची काळजी तुम्हालाही वाटत असेल. तर मग हा लेख तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने दही सँडविच कसे बनवायचे ते सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलाला स्वादिष्ट नाश्ता खायला देऊ शकाल. दही सँडविच एक असा पदार्थ आहे जो दुपारच्या छोट्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे. यामुळे तुमची भूक तर भागेलच शिवाय तोंडाला चवही येईल. पाहूया हा पदार्थ नेमका कसा बनवायचा.
-१ वाटी दही
-ब्रेड
-लोणी
-मीठ
-काळी मिरी पावडर
-चाट मसाला
-१ चिरलेला कांदा
-टोमॅटो
-सिमला मिरची
-चिरलेली कोथिंबीर
दही सँडविच बनवण्याची रेसिपी-
दही सँडविच बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दही घ्या. दही पूर्णपणे फेटा. फेटल्यानंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घाला.सर्व काही मिक्स केल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर आणि थोडा चाट मसाला घाला. पुन्हा एकदा चमच्याच्या मदतीने हे मिश्रण व्यवस्थित मिसळा. शेवटी त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.
आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर हे मिश्रण लावा. मिश्रण व्यवस्थित लावल्यानंतर दुसरी ब्रेड स्लाइस त्याच्या वर ठेवा. यानंतर, पॅन गरम करा, त्यावर बटर लावा आणि नंतर सँडविच सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. तुम्ही हे सँडविच तुमच्या मुलाला चहासोबत सर्व्ह करू शकता. सँडविच करण्यासाठी तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता.