Tamannaah Bhatia puts saliva on her face: आपली त्वचासुद्धा निरोगी, चमकदार आणि सुंदर दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. बऱ्यापैकी सर्व अभिनेत्रींची त्वचा अशीच असते. त्यामुळे अनेकांना सेलिब्रेटींच्या ग्लोइंग त्वचेची भुरळ पडते. सेलिब्रेटी आपली त्वचा सुंदर बनवण्यासाठी विविध उपाय करत असतात. त्यामध्ये व्यायामापासून, डाएटपासून ते अनेक महागड्या प्रॉडक्टसपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. परंतु बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपला ब्युटी सिक्रेट सांगत सर्वांनाच चकित केलं आहे. अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी सांगितले होते की ती आपल्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी सकाळी आपली लाळ चेहऱ्याला लावते. हो हे खरं आहे. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या सौंदर्याचे रहस्य उघड केले होते. यावेळी तिने सांगितले होते की, ती सकाळी चेहऱ्यावर लाळ लावते. आणि यामागचे कारणही तिने सांगितले होते.
काही महिन्यांपूर्वी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत त्वचेच्या काळजीशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना तमन्नाने सांगितले होते की, तिला देखील पिंपल्स येतात आणि संपूर्ण चेहरा लाल होतो किंवा निस्तेज होतो. आपण करत असलेल्या उपायाविषयी बोलताना ती म्हणाली होती की, 'तुम्ही विचाराल की मी माझ्या चेहऱ्यावर लावलेली सर्वात विचित्र गोष्ट कोणती आहे, तर याचं उत्तर आहे माझी स्वतःची लाळ. जी सकाळी तोंडात असते. त्यात पिंपल्स घालवण्याची ताकद असते. मला माहित आहे की, तुम्हाला ते थोडे किळसवाणे वाटेल, परंतु ते खरोखर उत्तम कार्य करते.' शिवाय तमन्नाने पुढे सल्ला दिला की, जर त्वचेच्या समस्या दीर्घकाळ राहिल्या तर महिलांनी स्वतःचे उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तमन्नाचे हे वक्तव्य ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, तर आणखी एका गोष्टीने तुम्हाला धक्का बसू शकतो. कारण अभिनेत्रीच्या या म्हणण्याला विज्ञानही समर्थन करते. वास्तविक २०१९ मध्ये, NCBI चा अभ्यास 'मानवी लाळ त्वचा आणि तोंडाच्या जखमा बरे करण्यास उत्तेजित करते' प्रकाशित झाला होता. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की मानवी थुंकी किंवा लाळ तोंडाच्या आणि त्वचेच्या जखमा बऱ्या करण्यात आणि जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
अभ्यासानुसार, मानवी लाळेमध्ये एनलजेसिक आणि ओपिओरफिन गुणधर्म असतात. यासोबतच यामध्ये हिस्टाटिन नावाचे प्रोटीन आढळते. जे जखम बरे होण्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे जखमा आणि त्वचेच्या इतर समस्या बरे करण्यासाठी लाळ प्रभावी ठरू शकते. या गुणांमुळे आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे, सकाळच्या लाळेमध्ये चेहेऱ्यावरील मुरुम बरे करण्याची आणि चमक वाढवण्याची शक्ती असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)