भारतात सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्यास इच्छुक जोडप्यांसाठी सरोगरी प्रक्रियेसाठीचे नियम बदलण्यात आले आहे. नवीन नियमांनुसार विवाहित जोडप्यांपैकी एकाला काही वैद्यकीय समस्या असल्यास त्याला दात्याकडून अंडे किंवा शुक्राणू घेऊन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुधारित सरोगसी नियम २०२२ नुसार पती किंवा पत्नी यापैकी ज्यांना कुणाला वैद्यकीय समस्या असेल त्यांना जिल्हा वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. सरोगसीद्वारे जन्माला येणाऱ्या मुलामध्ये इच्छुक जोडप्याकडून किमान एक गॅमेट (अंडे/शुक्रणू) असणे आवश्यक असल्याचे सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. विवाहित जोडप्यापैकी दोघांनाही वैद्यकीय समस्या असतील आणि त्यांचे स्वतःचे युग्मक ठेवण्यास असमर्थ असतील तर असे जोडपे सरोगसीचा पर्याय निवडू शकणार नाही.
नव्या अधिसूचनेनुसार सरोगसीचा पर्याय वापरून मूल जन्माला घालू इच्छिणाऱ्या एकल महिलांना (विधवा अथवा घटस्फोटित महिला) सरोगसी प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी स्वत:चे अंडे आणि दात्याकडून शुक्राणूंचा वापर करणे आवश्यक ठरणार आहे.
सरोगसी प्रक्रियेचा वापर करणाऱ्या इच्छुक जोडप्यांना स्वतःचे दोन्ही युग्मक असणे आवश्यक ठरवणारा आधीचा नियम बदलण्यात आला आहे.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एका दुर्मिळ जन्मजात विकार असलेल्या महिलेला दात्याकडून अंडे घेऊन सरोगसी करण्याची परवानगी दिली होती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशभरातील महिलांनी कोर्टात याचिका केल्या होत्या. त्यानंतर ही दुरुस्ती करण्यात आली आहे. केंद्राने मार्च २०२३ मध्ये एक अधिसूचना जारी करून सरोगसीचा पर्याय घेऊन मूल जन्माला घालू इच्छिणाऱ्या जोडप्यांना दोन्ही डोनर गॅमेट्स घेण्यावर बंदी घातली होती.
सर्वोच्च न्यायालयाने १४ मार्च २०२३ रोजी सरोगसीबाबतच्या नियम ७ मध्ये काही बदल केले होते. या बदलानंतर सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. 'सरोगेट आईची संमती आणि सरोगसीचा करार' याविषयी नियम ७ मध्ये उल्लेख करण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिलेल्या निर्णयात सरोगसीबाबत आधीच्या नियमांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशा नियमांमुळे सरोगसीचा हेतूच नष्ट होत असल्याचे म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने दोन डझनहून अधिक याचिकाकर्त्यांना सरोगसीद्वारे आई होण्यासाठी दात्यांकडून अंडे घेण्याची परवानगी दिली होती. त्यावेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले होते.
संबंधित बातम्या