Rock Salt for Glowing and Soft Skin: उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा, एक्ने आणि पिंपल्स सोबतच त्वचेचा कोरडेपणा देखील वाढू लागतो. मीठ त्वचेला मऊ आणि गुळगुळीत बनवू शकते. कारण त्यात मिनरल्स असतात आणि डेड स्किन काढण्यासाठी हा एक चांगला नैसर्गिक स्क्रब आहे. पण मीठ थेट त्वचेवर वापरणे हानिकारक ठरू शकते. म्हणून फेस मास्क आणि स्क्रबसाठी मीठ वापरून आपले सौंदर्य वाढवता येते. ग्लोइंग आणि सॉफ्ट स्किन मिळवण्यासाठी मीठ कसे वापरावे ते येथे जाणून घ्या.
जर तुम्हाला चेहऱ्याची त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग हवी असेल तर फेस मास्कमध्ये मीठ मिसळून फेस पॅक तयार करा. यासाठी फक्त दोन चमचे मध घ्या. नंतर त्यात अर्धा चमचा सैंधव मीठ घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. मध बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ म्हणून काम करेल. तर मीठाच्या मदतीने सर्व छिद्र साफ होतील आणि त्वचा खूप मऊ दिसू लागेल.
चेहऱ्यावर तसेच मान, पाठ, हात आणि पाय यांच्या त्वचेवर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी सैंधव मिठाच्या मदतीने नैसर्गिक स्क्रब तयार करता येतो. फक्त एक चतुर्थांश कप खोबरेल तेल घ्या. त्यात अर्धा कप सैंधव मीठ मिक्स करा. आता हे मिश्रण हात, पाय आणि शरीरावर लावा. या नैसर्गिक बॉडी स्क्रबने केवळ मृत त्वचाच स्वच्छ होणार नाही तर त्वचा पूर्णपणे मुलायम होईल. याशिवाय छिद्रही स्वच्छ होतील. खोबरेल तेल त्वचा गुळगुळीत करेल आणि मीठ सर्व मृत त्वचा स्वच्छ करेल.
सैंधव मीठाच्या मदतीने तयार केलेला टोनर त्वचेला फ्रेश बनवेल आणि घामामुळे कोरडी झालेली त्वचा निरोगी दिसेल. टोनर बनवण्यासाठी अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा सैंधव मीठ विरघळवा. हे पाणी थंड झाल्यावर या पाण्यात कॉटन बॉल्स बुडवून त्वचेला लावा. यामुळे त्वचेचे तेल उत्पादन संतुलित होईल आणि एक्ने कमी होण्यास मदत होईल. सैंधव मिठात अँटी- मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे त्वचा स्वच्छ करण्यात आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यात मदत करेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)