पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जांभई देणे का अडवू नये? असे केल्यास काय होते?

जांभई देणे का अडवू नये?

एखादे व्याख्यान ऐकताना, एखाद्या सभेमध्ये  चर्चा सुरु असताना, कोणाशी निरर्थक गप्पा चालू असताना किंवा टीव्हीवरचा कंटाळवाणा कार्यक्रम बघताना जांभई येण्याचा अनुभव तुम्हांला असेलच. आपल्या रोजच्या जीवनमध्ये जी जांभई दिवसभरातून निदान एकदा तरी   आपण देतो त्या जांभईविषयी समजून घेऊ.

एक जांभई द्यायला किती वेळ  लागतो, माहीत आहे? सरासरी पाच ते सहा सेकंद! पाच-सहा सेकंद तोंड उघडे ठेवताना तोंडात किटाणू, जीवाणू, विषाणू वगैरे शिरण्याचा धोका लक्षात घेऊनच आपल्या पूर्वजांनी जांभई देताना तोंडावर हात ठेवायला आपल्याला शिकवले. मनुष्याशिवाय इतर कोणते प्राणी जांभई देतात?  या प्रश्नाचे उत्तर आहे  “जवळजवळ सगळेच प्राणी आणि आश्चर्य म्हणजे मगर, मासे व सापसुद्धा”. जांभया देणार्‍या माणसाला झोप येत आहे, असा अर्थ सर्वसाधारणपणे आपण काढतो. यामागचे विज्ञान काय आहे?

वास्तवात जेव्हा शरीराची , विशेषतः मेंदुची ऑक्सिजनची गरज वाढते तेव्हा मनुष्याला जांभया येऊ लागतात. पण मेंदुची ऑक्सिजनची गरज का वाढते?  जेव्हा मनुष्याला उर्जेची अधिक मागणी करणारे काही विशेष काम करायचे असते तेव्हा. अधिक उर्जेसाठी गरज असते अधिक ऑक्सिजनची. पण ऑक्सिजन कमी का पडतो? एखाद्या व्यक्तीला रात्री व्यवस्थित झोप मिळाली नसेल तर त्याला ऑक्सिजन कमी पडतो. 
शरीराला कमी पडलेला हा ऑक्सिजन मिळवण्यासाठी तोंड मोठ्ठे उघडून अधिक प्रमाणात हवा शरीरात खेचून  घेतली जाते, ज्याला आपण ‘जांभई’ म्हणतो. दुसरीकडे काही संशोधक रक्तात कार्बन डायॉक्साईड वाढतो तेव्हा मोठ्‌ठी जांभई देऊन तो अतिरिक्त कार्बन डायॉक्साईड बाहेर फेकण्याचा शरीर प्रयत्न करते असे म्हणतात. 

सकाळी राजाप्रमाणे न्याहारी करावी का?

जांभई येण्यामागे ’कंटाळा’ हे सुद्धा एक  महत्त्वाचे कारण असते. जगभर झालेल्या विविध संशोधनात हे दिसून आले आहे की, समोर चालू असलेल्या कामाचा, घटनेचा, चर्चेचा वा बोलण्याचा जेव्हा माणसाला कंटाळा येतो तेव्हा त्याला जांभया येतात. एखाद्या अध्यापकाचे व्याख्यान कंटाळवाणे होत असेल तर विद्यार्थ्यांना कंटाळा का येतो, हे इथे लक्षात येते. साधारण ६ जांभयांनंतर मनुष्याचे डोळे जडावतात व तो झोपायला तयार होतो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की गर्भाशयातले ११ आठवड्यांचे बाळसुद्धा जांभई देते. खरं पाहाता गर्भाशयातले बाळ काही फ़ुफ़्फ़ुसांवाटे श्वसन करत नाही, म्हणजे ऑक्सिजन मिळावा वा कार्बन डायॉक्साईड बाहेर फेकावा  म्हणून काही ते जांभई देत नाही हे नक्की. मग ते जांभई का देते? याचे समाधानकारक उत्तर शास्त्रज्ञ देऊ शकत नाहीत.

मस्तिष्कामधील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी शरीर जांभई निर्माण करते असाही काही अभ्यासकांचा विचार आहे. जांभई संसर्गजन्य आहे असे म्हणतात, तेही खरेच आहे. जी सवय  आपल्या पुर्वजांकडून अर्थात चिपान्झींकडून आली असावी. जांभई देऊन चिपान्झी एकीकडे संपूर्ण समूहाला जागरूक करण्याचा  प्रयत्न करतो, ज्याचे अनुकरण करुन समुहातले इतर एकी दाखवण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे  जांभई देताना आपल्या दातांचे सुळे इतर प्राण्यांना दाखवून चिपान्झी त्यांना घाबरवू पाहतो. एकंदरच जांभईचा हा संसर्ग दीड वर्षे वयापासुन सुरु होतो, असे म्हटले जाते. समोरच्या व्यक्तीला जांभई देताना बघून तुम्हाला जांभई देण्याचा मोह आवरत नाही आणि तुम्ही सुद्धा जांभया द्यायला लागता. आत्ता हा जांभई विषयक लेख वाचतानासुद्धा तुम्हाला जांभई येत नाहीये ना!

१२ व्या वर्षी मुकेश अंबानी भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत

या जांभईबद्दल आयुर्वेदाने एक विशेष मार्गदर्शन केले आहे. आयुर्वेदानुसार जांभई ही मल, मूत्र, अधोवायू, शिंक यांच्याप्रमाणेच एक नैसर्गिक  क्रिया आहे, ज्याला आयुर्वेदाने ’नैसर्गिक वेग’ म्हटले आहे. नैसर्गिक वेग अडवणे शरीराला त्रासदायक होते, इतेकच नव्हे तर  रोगकारकसुद्धा होते असे आयुर्वेदाचे  सांगणे आहे.

जांभई हा वेग अडवल्याने होऊ शकणारा  पहिला त्रास म्हणजे विविध प्रकारच्या शिरोव्यथा. शिरोव्यथा म्हणजे शिरा (डोक्या) संबंधित विविध विकार. जसे-डोकेदुखी, डोके धरणे, जड होणे, चक्कर, वगैरे. याशिवाय जांभई अडवल्यामुळे इन्द्रियदौर्बल्य संभवते, म्हणजे नाक, कान, डोळे, जीभ या इन्द्रियांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. अचानक  मान आखडण्य़ाचा त्रास जेव्हा एखाद्याला होतो, तेव्हा त्यामागेसुद्धा आलेली जांभई अडवणे हे कारण असू शकते. महत्त्वाचे म्हणजे  तोंड वाकडे (फ़ेशिअल पॅरालिसिस) होणे हा आजार होण्याची शक्यताही जांभई अडवण्यामुळे संभवते, असे आयुर्वेदाने सांगितलेले  आहे.

जांभई चा वेग अडवणे आणि त्यामुळे होऊ शकणारे त्रास यांचा थेट  कार्यकारण संबंध समजावून सांगणे कठीण असले तरी जांभईसारखा  वेग तयार करण्यासाठी लागणारे बल (फ़ोर्स) अडवले, तर ते बल उलटा परिणाम (बॅक प्रेशर इफ़ेक्ट) दाखवणार यात काही शंका नाही. जांभई देताना हृदयाच्या गतीमध्ये वाढ होते, त्वचेची विद्युतवहन क्षमता वाढते, सकारात्मक हार्मोन्सचे स्त्रवण वाढून मेंदुला उद्दिपन मिळते. इतक्या सगळ्या  जांभईमुळे शरीराला अपेक्षित असणार्‍या क्रिया  जांभई अडवल्यामुळे जर  अचानक थांबणार असतील तर त्याचा शरीरावर विपरित परिणाम हा होणारच. तो टाळण्यासाठीच आयुर्वेदाने जांभई न अडवण्याचा सल्ला दिलेला आहे. मथितार्थ काय तर जेव्हा केव्हा जांभई येईल तेव्हा ती न अडवता मस्त ताणून जांभई द्या.