पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक महिला दिन विशेष : ती, तो आणि कपडे

प्रातिनिधिक छायाचित्र

''तू असेच कपडे घालून नेहमी वावरते का?''
''हो अर्थात! काय वाईट आहे या कपड्यांत?''
''नाही. वाईट काहीच नाही पण लग्नानंतर आमच्या घरात हे असलं काही चालायचं नाही.''
''असलं काही म्हणजे?
''हेच असे अंगप्रदर्शन करणारे कपडे वगैरे..''
''असे अंगप्रदर्शन करणारे? पण हा डिसेंट वनपीस आहे. पूर्ण बाह्यांचा, गळा झाकलेला आणि गुडघ्यांच्याही खाली आहे मग गैर ते काय त्यात?''
''तरीही, माझी ताई, वहिनी, आई सगळ्याच साड्या नेसतात किंवा ड्रेस घालतात तुलाही तसंच राहावं लागेल त्यामुळे लग्नानंतर तूही त्यांचा आदर्श घ्यावा.''
''यात आदर्श घेण्यासारखं काय आहे? कुठे काय घालवं याचं भान असण्याइतकी मी सूज्ञ आहे. उद्या सत्यनारायणाच्या पूजेला मी काही जीन्स आणि क्रॉप टॉप घालून बसणार नाही तिथे पारंपारिक साज जपावा इतकं मला कळतं.''

Womens Day Special : ती पंतप्रधान निवडू शकते पण जोडीदार नाही?

''ते काही नाही.. नाही म्हणजे नाही...''
''अरे पण तू मल्टिनॅशनल कंपनीत काम करतोस तिथे यापेक्षाही तोकड्या कपड्यात मुली वावरतात की..''
''म्हणूनच नाही.... मधल्या सुट्टीत आम्ही मुलं ग्रुप करून त्यांच्या गोऱ्या पायांकडे बघत असतो, मज्जा येते राव पाहायला.''
''लाज वाटली पाहिजे तुला हे सांगताना''
''आम्हाला त्यात लाज वाटत नाही, कारण त्या दाखवण्यासाठी घालत असतील ना कदाचित. मग आम्ही बघतो त्यात लाज कसली? उलट मज्जा येते. आता लग्न झाल्यावर माझ्या बायकोची अशी मज्जा कोणी घेऊ नये म्हणून सांगतोय राव.. ''
त्याचक्षणी तळपायाची आग मस्तकात गेली.. ''तू उठ आणि चालता हो, माझा हात उठायच्या आधी'', असं म्हणून मी त्याला चालतं केलं. पण मला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून राहून राहून आश्चर्य वाटलं की एका उच्चशिक्षित चांगल्या पगारावर आणि चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या आजच्या पिढीत अशी कीड अजूनही वळवळते आहेच का?

दुसऱ्यावेळी जीन्स आणि पूर्ण बाह्याचा शॉर्ट कुडता घालून दुसऱ्या मुलासमोर गेले. इथल्या तिथल्या गप्पा संपल्यानंतर मुलानं थेट मुद्याला हात घातला.
''आमच्या घरचं वातावरण धार्मिक आहे, घरात आणि बाहेर साडी किंवा ओढणी असलेला ड्रेसच घालून वावरावं लागेल. मॉर्डन राहता येणार नाही, हा पण बायको आणि मी असे बाहेर फिरायला गेलो तर एखाद दुसऱ्यावेळी जीन्स पँट घालायला हरकत नाही.
''पण धार्मिक वातावरण आणि कपड्यांचा काय संबंध?''
''नाही, हल्लीच्या मॉर्डन मुली धार्मिक नसतात''
''मी आठवड्यातून एकदा देवळात अगदी वेळ काढून खास आरतीसाठी जाते.. पुढचं बोलं..''
''तरीही नाही... आम्हाला साधी मुलगी हवी. आई सांगेल त्याप्रमाणेच राहावं लागेल.''
''कोण म्हणालं की जीन्स घालणारी मुलगी वाईट आणि ड्रेस घालणारी मुलगी चांगली असते? प्रत्येकाचा स्वभाव असतो. कपड्यांवरुन स्वभावाचा अंदाज कसा लावता येईल बरं?''
याही मुलाकडे प्रश्नाचं उत्तर नाही, हाही मुलगा उच्चशिक्षित, हुशार आणि भरपूर पगार घेणारा..

महिला दिन विशेष : ''अशा स्त्रियांकडे 'अतिशहाणी' म्हणून पाहिलं जातं''

काही दिवसांपूर्वी मैत्रिण भेटली होती. तिचा अनुभव तर याहूनही भयंकर होता. खुद्द मुंबई शहरात वाढलेली, कपड्यांची आवड असलेली आजची मॉर्डन मुलगी. मुलगा दिसण्या राहण्यावर भाळला, मात्र लग्न झाल्यावर सासू आणि नवरा कपड्यांवरुन का कू करु लागले. घरात आणि घराबाहेरही सुनेनं साडी तरी नेसावी किंवा पूर्ण बाह्यांचे कुडते तरी घालून वावरावं असा अट्टाहास. मॉडर्न सुनेनं तेही केलं, ''पण कधीतरी जीन्स घालावी, छान डिसेंट वनपीस घालावा असं मलाही वाटतं ना. सासू आणि नवऱ्याला आवडत नाही म्हणून लग्नानंतर सगळ्या जीन्स कपाटात ठेवल्या होत्या. एकालाही हात लावला नाही, त्यादिवशी सहज घालावीशी वाटली. घालून ऑफिसलाही गेले आल्यानंतर बघते तर काय चिडलेल्या सासूबाईंनी सारे कपडे भांडीवाल्याला देऊन टाकले होते.'' तिचा अनुभव ऐकून यावर काय बोलावं असा प्रश्नच पडला.
''नवऱ्याकडे तक्रार केल्यावर तो म्हणला आम्हाला वाटलं लग्नानंतर तू सुधारशील पण तू तर...''
या त्याच्या उत्तरावर मला हसूच अनावर झालं. मुळात शहरातल्या मुलींनी जीन्स घालणं हे वाया गेल्याचं लक्षण आणि जीन्स सोडून ड्रेस घालणं म्हणजे सुधारणं हे एखाद्याला जज करण्याचं प्रमाण कसं काय असू शकतं? याचं मला आश्चर्य वाटलं.

कामाच्या ठिकाणी पुरुषांपेक्षा महिला कर्मचारी अधिक समंजस

अशी एक नाही अनेक मुलं मला भेटली. मुलींच्या कपड्यांबाबत थोड्याफार फरकानं त्यांची मतं सारखी होती. सगळी आजच्या पिढीतली. गर्लफ्रेंड मॉर्डनं हवी मात्र बायको  डोक्यावर पदर घेऊन, खाली मान घालून वावरणारी हवी या विचाराची. माझं जीन्स घालणं आवडत नसेल तर मी बदलायला तयार आहे मग तूही माझ्यासोबत झब्बा धोतर घालून फिरणार आहेस का? असं विचारल्यावर निरुत्तर असणारी. तू बिनबाह्यांचे ब्लाऊज घालू नको, कारण आईला आवडणार नाही... जीन्स घालू नको, कारण बाबांना पटणार नाही... वनपीस घालायचा नाही कारण मी खपवून घेणार नाही... असं सांगणारी.

कोणी काय घालावं आणि कसं राहावं, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आपल्यावर काय साजेसं दिसतं आणि काय नाही, कुठे काय घालावं आणि काय नाही हे समजण्याइतकी ती मुलगी सुज्ञ असेल, स्वभाव उत्तम असेल, घरच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याइतकी ती सक्षम असेल तर मग केवळ कपड्यांचा बाऊ करून तिला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न का बरं करावा? ही मानसिकताच समजण्यापलीकडे जाते. उद्या ड्रेस घालणारी मुलगी साधी समजून तिला घरात आणलं आणि तिनं तुमच्या आई वडिलांना काही कारणानं घराबाहेर काढलं तर काय करणार?

७१ % महिला म्हणतात दररोज व्यायामासाठी वेळच नाही

कपड्यांना स्वभावाशी जोडून निष्कर्ष काढण्याची मानसिकता म्हणजे निव्वळ मूर्खपणा. कपडे हे शरीरावर असतात, त्यानं केवळ शरीर झाकलं जातं, माणसाचं कलुषित मन किंवा अहंकारी स्वभाव नाही. तो कधीना कधी समोर येणारच याचाही विचार आपण केला पाहिजे... नाही का?

- प्रतिक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@htdigital.in