पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

दिवाळी खरेदी

धनत्रयोदशी आणि दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. विक्री वाढवण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलत देत आहेत. बँका सुध्दा स्वस्त कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, या दिवाळीमध्ये खरेदीवर मोठी बचत करण्याची सुवर्णसंधी आहे. त्यासाठी अनेक गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. आपण या संधीचा फायदा घेऊन छोटी आणि मोठी स्वप्न पूर्ण करण्यासोबतच बचत सुध्दा करु शकता. 

बजेट तयार करणे फायद्याचे ठरेल - 
सणादरम्यान आपल्यापैकी अनेक जण अतिरिक्त सवलत उपलब्ध आहे यावर विश्वास ठेवून क्रेडिट कार्डचा वापर करुन खरेदी करतात. ही खरेदी करताना अनेक जण अवाक्याबाहेर खर्च करतात. त्यानंतर कर्जाचे ओझे वाढते आणि आर्थिक स्थिती कमकुवत होते. त्यामुळे सणांच्या खरेदीपूर्वी बजेट तयार करुन खरेदी करणे फायदेशीर ठरते. 

जास्त खरेदी करणे टाळा -
दिवाळीत आपण बर्‍याचदा अनावश्यक वस्तू खरेदी करतो. त्यासाठी आवश्यक वस्तूंची यादी तयार करुन आपण या सवयीवर नियंत्रण ठेवू शकतो. असे केल्याने आपण केवळ त्याच वस्तू खरेदी करु ज्यांची आपल्याला गरज आहे. ही पद्धत आपल्याला बचत करण्यात देखील मदत करेल.

सवतीच्या नादात फिरु नका -
सर्व कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर सवलत देत आहेत. फक्त जास्त सवलत मिळविण्यासाठी आपण कोणतीही खरेदी करू नये. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वस्तूंची गरज लक्षात घेऊन खरेदी केली पाहिजे. कधीही जास्त सवलत मिळविण्यासाठी खरेदी करणे म्हणजे तोटाच आहे. म्हणून, प्रथम आपली गरज समजून घ्या आणि नंतर ती वस्तू ऑनलाइन किंवा ऑफलाइन कुठे स्वस्त मिळेल हे शोधा.

खरेदी करण्यापूर्वी योग्य किंमत शोधा - 
आजकाल ऑनलाईन शॉपिंगवर जास्त भर दिला जातो. सर्व प्रकारच्या वस्तू एकाच क्लिकवर उपलब्ध होतात. त्यामुळे घर बसल्या वस्तू ऑर्डर करण्यापूर्वी हे निश्चित केले पाहिजे की कोणत्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करणे योग्य आहे आणि कोणत्या वस्तू बाजारातून घेणे चांगले आहे. ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी, वस्तू पाहण्यासाठी स्टोअरमध्ये जा आणि किंमत तपासा. यानंतर ऑर्डर द्या. कदाचित आपल्याला दुकानात ती वस्तू ऑनलाइनपेक्षा स्वस्त मिळेल. यामुळे तुम्ही नंतर होणाऱ्या पश्चातापापासून वाचू शकाल आणि बचत सुध्दा होईल. 

या चुका टाळा - 
सवलतीचा फलक पाहून खरेदीसाठी जाऊ नये. बर्‍याच वेळा सवलतीच्या प्रलोभनात महागड्या वस्तूंची खरेदी होते. म्हणून, निर्णय घेण्यापूर्वी खऱ्या आणि खोट्या गोष्टी जाणून घ्या. तसंच, सणासुदीच्या खरेदी दरम्यान, मनी बँक, एक्सचेंज या रिटर्न पॉलिसीज याची माहिती जाणून घ्या त्यानंतरच खरेदी करा.