आज विचार करु वसंतातल्या 'गुढीपाडवा' या हिंदू नववर्षाच्या उत्सवदिनी सेवन केल्या जाणार्या श्रीखंडाचा. प्रत्यक्ष भीमाने तयार केलेल्या या मिष्टान्नाचा आस्वाद श्रीकृष्णाने पुन्हा पुन्हा घेतला असं म्हणतात. श्रीखंड तयार करण्यासाठी ताजे दही स्वच्छ कपड्यात गुंडाळून रात्रभर लटकावून ठेवले जाते, जेणेकरुन त्यामधील पाणी निथळून जाईल. यानंतर तयार होतो तो चक्का. हा चक्का व्यवस्थित घोटून त्यामध्ये साखर मिसळून पुन्हा एकजीव होईपर्यंत घोटून आणि त्यामध्ये चवीसाठी वेलची, केशर वगैरे घालून श्रीखंड तयार करतात, जे अस्सल देशी मिष्टान्न आहे.
का कोणास ठाऊक पण मागील तीस-चाळीस वर्षांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंडच खाण्याचा प्रघात पडला आहे, पण ही काही परंपरा नाही. मकरसंक्रांतीचे तीळगूळ, होळीच्या दिवशी पुरणपोळी, गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची चटणी या आयुर्वेदकर्त्या संशोधक ऋषींनी समाज-आरोग्याच्या हितार्थ रचलेल्या खाद्य-परंपरा आहेत. पण यामध्ये श्रीखंड कसे काय आले, हा एक अभ्यासाचाच विषय व्हावा. कारण वसंत ऋतुतल्या या दिवसांमध्ये जेव्हा निसर्गतः कफ बळावलेला असतो तेव्हा श्रीखंड खाणे अजिबात योग्य नाही, ज्याची एक नाही अनेक कारणे देता येतील.
वसंतात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य आहेत, मग श्रीखंड कसे चालेल? वसंतात पचायला हलका आहार अपेक्षित असतो तर गुरु म्हणजे पचायला जड पदार्थ वर्ज्य असतात, मग श्रीखंड कसे चालेल?वसंतात बलवर्धक नाही तर हिवाळ्यातल्या अतिपोषणामुळे शरीरावर जमलेली चरबी कमी करणारा आहार अपेक्षित असतो, मग बलवर्धक व पौष्टिक श्रीखंड कसे चालेल? वसंतात शरीरामध्ये कोरडेपणा कमी करणारा आहार अपेक्षित असतो तर स्निग्धता वाढवणारे पदार्थ त्याज्य असतात, मग स्निग्ध गुणांचे श्रीखंड कसे चालेल? वसंतात कडू-तिखट-तुरट चवीचे पदार्थ खाणे अपेक्षित असते तर गोड व आंबट चवीचे पदार्थ टाळायचे असतात, मग श्रीखंड कसे चालेल? साखरेच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, मग साखरेचा आगार असलेले श्रीखंड कसे चालेल? एकंदरच वसंतात कफाचे आजार बळावलेले असताना कफवर्धक श्रीखंड कसे चालेल? त्यातही कफप्रकृती व्यक्तींनी आणि ज्यांना सर्दी, ताप, कफ, खोकला,सायनस,दमा यांसारखे कफविकार झाले आहेत किंवा होण्याचा धोका आहे अशा मंडळींनी तर श्रीखंडापासून दूरच राहावे.
१६ व्या शतकात लिहिलेल्या भावप्रकाश या ग्रंथाने तर 'एषा येन वसन्तवर्जितदिने' असे सांगून वसंत ऋतुतल्या दिवसांत श्रीखंड खाण्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे आणि 'ग्रीष्मे तथा शरदि ये रविशोषिताङ्गा ये' या शब्दात जेव्हा शरीरे सुर्याच्या उष्म्याने सुकलेली असतात, त्या ग्रीष्म-शरद या उष्ण ऋतुंमध्येच याचे सेवन करावे' असे मार्गदर्शन केले आहे. या वर्षीच्या वसंत ऋतुमध्ये संपूर्ण समाज कफसंबंधित श्वसनविकाराच्या कचाट्यात असताना श्रीखंड खाणे योग्य होणार नाही , हे सूज्ञ वाचकांना आता वेगळं सांगायला नको.
//सर्वे सन्तु निरामयाः//
जाता जाता एक गंमत -
बहुतांश महत्त्वाच्या शब्दकोषांमध्ये ’श्रीखंड’ या शब्दाचा अर्थ चंदन असा दिला असून, कुठेही खाद्यपदार्थ वा गोड मिष्टान्न असा अर्थ दिलेला नाही. मुळात या खाद्यपदार्थाचे नाव श्रीखंड नसुन 'रसाला' आहे ज्याचा उल्लेख ईसवीसनापुर्वी दीड हजार वर्षांपुर्वी रचलेल्या सुश्रुतसंहितेमध्ये आढळतो आणि सुश्रुतसंहितेवर १२ व्या शतकात भाष्य करणार्या डल्हणाने 'रसाला म्हणजेच शिखरिणी' असे म्हटले आहे. हा 'शिखरिणी' शब्दच श्रीखंडामध्ये परावर्तित झाला असेल असं वाटतं. जो प्रवास 'शिखरिणी→ शिखरण→ शिक्रण→ शिक्रंड→ श्रीखंड' असा झाला असावा.
- वैद्य अश्विन सावंत
drashwin15@yahoo.com