पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Diwali: फटाक्यांच्या प्रदूषणापासून सुरक्षित ठेवतील 'या' ५ टिप्स

दिवाळी २०१९

दिवाळी सण प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. मोठ्या उत्साहात आपण हा सण साजरा करत असतो. यावेळी फराळ खाण्यासोबतच फटाके वाजवण्याचा देखील तितकाच आनंद घेतला जातो. मात्र दिवाळीच्या उत्साहात आपण आपल्या आरोग्याची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. फटाक्यांचा आवाज आणि धुरामुळे आपल्या आरोग्यावर कोणताच परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी खालील ५ टिप्स जाणून घ्या -

अस्थमा किंवा श्वसनासंबंधी त्रास असलेली लोकांसाठी - 
जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील एखाद्याला अस्थमा किंवा श्वसनासंबंधित त्रास असेल. तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. फटाक्यांमुळे त्रास झाला तर आधी कोणती पावलं उचलली पाहिजे किंवा घरगुती उपचार कशा पध्दतीने केले पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घ्या. तसंच अशा लोकांनी अशा ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा जिथे फटाक्यांचा धूर किंवा आवाज येत नाही.

फटाके फोडल्यानंतर साबणाने हात धुवा - 
फटाक्यांमध्ये असणारी काही रसायने आपल्यासाठी खूप हानिकारक असतात. यातील काही रसायने अशी असतात ज्याला हात लागताच जळजळ होते. अशामध्ये तुमची मुलं किंवा तुम्ही फटाके फोडणार असाल तर फटाके फोडल्यानंतर हात स्वच्छ धुवा त्यानंतरच दुसरे काम करा. 
 
चेहरा आणि शरीरावर क्रीम किंवा तेल लावा -
दिवाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. त्यामुळे फटाक्यांचा धूर आणि हानिकारक रसायने हवेत मिसळतात. ते आपल्या त्वचेसाठी घातक असतात. अशा परिस्थितीत त्वचेचा हवेबरोबर थेट संपर्क होऊ नये म्हणून त्वचेचा ओलावा टिकवून ठेवणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे त्वचेला तेल किंवा क्रीम लावा. 

तळलेले पदार्थ कमी खा - 
दिवाळीमध्ये फराळ बनवले जाते. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कमी तळलेले पदार्थ खाण्याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे. कारण फटाक्यांच्या धुरामुळे तुम्हाला त्रास होईल. तळलेले पदार्थ खाल्यामुळे तुमचे वजन देखील वाढेल आणि ते पचन होण्यास देखील जास्त वेळ लागतो. 

डोळ्यांच्या वरच्या भागावर कोरफडीचा गर लावा -
आपल्या डोळ्याच्या वरचा भाग खूप नाजूक असतो. फटाक्यांच्या धुरामुळे त्यावर परिणाम होतो. त्यामुळे फटाके फोडण्यापूर्वी डोळ्याच्या वरच्या भागाला कोरफडीचा गर लावा. त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या वरच्या भागावर फटाक्यांमधील रसायने आणि धुराचा परिणाम होणार नाही. तसंच यामुळे तुमच्या डोळ्यात जळजळ देखील होणार नाही.