पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रक्ताचा वास घेऊन श्वानाकडून कर्करोगाचे निदान शक्य

कर्करोगावरील उपचार आणि श्वान

केवळ वासावरून आरोपीचा माग घेण्याचे काम पोलिस दलातील श्वान आतापर्यंत करत आले आहेत. पण श्वानाच्या याच गुणवैशिष्ट्याचा फायदा घेऊन आता एखाद्याला कर्करोग झाला आहे की नाही, याचा शोध घेणेही शक्य होणार आहे. परदेशात करण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे. एखाद्या रुग्णाच्या रक्ताचा वास घेऊन त्याला कर्करोग झाला आहे की नाही, हे प्रशिक्षित श्वान शोधू शकतो, असे आढळून आले.

कर्करोग झाला आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी सध्या तरी बायोप्सी हा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये शरीरातील संबंधित भागाचा छोटासा तुकडा काढून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जातो. प्रयोगशाळेच्या अहवालावरच डॉक्टर पुढील उपचार ठरवित असतात. पण आता केवळ श्वानाच्या साह्याने कर्करोगाचे निदान करणे शक्य होईल. त्यामध्येही ९७ टक्क्यांपर्यंत अचूकता येऊ शकते, असेही संशोधनात आढळून आले. त्यामुळे श्वान परीक्षेनंतरच संबंधित रुग्णाला बायोप्सी करण्याची गरज आहे की नाही, याचा निर्णय डॉक्टर करू शकतात. 

एखाद्या गोष्टीचा वास घेण्याची श्वानाची क्षमता ही मानवी क्षमतेपेक्षा १० हजार पटींनी जास्त असते. अनेकवेळा आपल्या नाकाला जे वास येत नाहीत, ते एखाद्या श्वानाला सहजपणे येतात. त्यामुळे या साह्याने कर्करोगाचे निदान करणे शक्य आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांनी हा शोधनिबंध 'अमेरिकन सोसायटी फॉर बायोकेमिस्ट्री ऍण्ड मॉलेक्युलर बायोलॉजी'च्या वार्षिक बैठकीत फ्लोरिडामध्ये सादर केला. 

कर्करागावर सध्यातरी कोणताही एकमात्र उपचार उपलब्ध नाही. तरीही कर्करोगाची लागण झाली असल्याचे जितक्या लवकर लक्षात येते, तितके त्यावर उपचार करणे लवकर शक्य होते, असे संशोधकांच्या चमूचे नेतृत्त्व करणारे हिदर जुंक्वेरा यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील 'बायोसेंटडीएक्स' या आरोग्य क्षेत्रातील कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत.

कर्करोगाचे निदान करण्याचे काम जर सहजपणे शक्य झाले, तर त्याचा रुग्णांना फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर या रोगावर उपचार करण्याच्या पद्धतीमध्येही बदल होऊ शकतो, असे हिदर जुंक्वेरा यांनी म्हटले आहे.