पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाऊबीजः यासाठी बहिणीने भावाला ओवळावे

भाऊबीज

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे दाते पंचांग यांनी सांगितले आहे

दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.

वर्षभरातील इतर सण - उत्सव यांच्या प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात - कुटुंबात एकोपा राखला जातो.

प्रत्येक धर्मीयांच्या सण - उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी - विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगती होण्यात या सण - उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.