पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोष्ट रावणाची... पण आपण न ऐकलेली!

असुर

इतिहास हा नेहमी जेत्याची गोष्ट सांगतो, पराजिताची नाही. जेत्याच्या पराक्रमाचा असतो इतिहास आणि पराजितांचा असतो तो 'धडा'. हा धडा प्रत्येकानं लक्षात ठेवायचा कारण पराजितांच्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही, यासाठी या धड्याची खूणगाठ पिढ्यानपिढ्या बांधून ठेवायची असते. आज लॉकडाऊमध्ये देशातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय मालिका रामायण ही पुन्हा सुरु झालीये. श्रीराम आपल्या वानरसेनेसह लंकेच्या दिशेनं कूच करत निघाले आहेत. इथपर्यंत तूर्त ही मालिका आली आहे. सीतेला पळवून नेणाऱ्या दशाननाचं रामानं काय केलं हे माहिती नसणारा क्वचितच कोणी इथे सापडले.

दसऱ्याला भारताच्या अनेक भागात रावणाच्या प्रतिमेचं दहन केलं जातं असं असलं तरी इथल्या काही भागात रावणाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा पूर्ण भिन्न आहे. इथे आजही रावण प्रतिमेचं दहन होत नाही. कारण त्यांच्या लोककथेतला रावण हा आपल्या मनातील रावणापेक्षा नक्कीच भिन्न आहे.. असो हा झाला वादाचा मुद्दा. काही वर्षांपूर्वी आनंद नीलकंठन या लेखकानं 'असुर' ही त्यांची पहिली कांदबरी प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. २०१२ मध्ये आलेली ही कांदबरी आजही तितकीच लोकप्रिय आहे. साधरणं आठ एक वर्षांपूर्वी त्याचं हे पहिलं पुस्तक 'नॅशनल बेस्ट सेलर'च्या यादीत पहिल्या क्रमांकावर होतं आणि बेस्ट सेलिंग म्हणजेच सर्वाधिक खपाचं पुस्तक ठरण्यामागचं कारण होतं 'असुर'ची कथा.

विजेत्याच्या नजरेतून नाही तर रावणाच्या आणि भद्राच्या नजरेतून लंकेच्या सर्वनाशाची कथा यात रेखाटली आहे. युद्धभूमीवर मरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या लंकानरेशाच्या आजूबाजूला त्याच्या लाखो सैनिकांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आहेत. कोल्हे, कुत्री लचके तोडण्यासाठी आजूबाजूला जमली आहे. अंत जवळ आला असताना या लंकाधिपतीच्या नजरेसमोरून भूतकाळातील अखंड गोष्टी झपझप तरळत जात आहेत.. येथून 'असुर'च्या कथेला प्रारंभ होतो.
एकवेळच्या जेवणाचीही भ्रांत असलेला रावण लंकेला सोन्यानं मढवणारा 'नरेश' कसा होतो याचा प्रवास 'असुर'मध्ये आहे. देव आणि असुर यांच्यातील वाद तेव्हाही होता, मात्र या वादात रावण कसा मोठा झाला, ज्याला पैशांची अजिबात कमतरता नव्हती अशा कुबेराचा सावत्र भाऊ असतानाही अन्नाच्या कणासाठी तळमळणाऱ्या रावणानं ही सोन्याची लंका कशी वसवली? की ती हिरावून घेतली? याची रंजक गोष्ट सुरुवातीच्या काही भागांत या पुस्तकात वाचायला मिळते.

मात्र यात सर्वाहून रंजक गोष्ट होती ती सीतेच्या जन्माची. धरणीच्या पोटात जनक राजाला सीता मिळाली असा इतिहास असला तरी 'असुर'च्या कथेत तिचा इतिहास काहीसा वेगळा आहे. लंकाधिपती झाल्यानंतर रावणाला पराकष्टानं कन्यारत्न प्राप्त होतं. लेकीवर जीवापाड प्रेम असलेल्या दशाननाला याचकाळात मनावर प्रघात करणारी भविष्यवाणी समजते. रावणाची ही मुलगी लंकेच्या दहनासाठी एकदिवस नक्की कारणीभूत ठरणार असं भाकित ज्योतिष वर्तवतात. आतापर्यंत लोकांसाठी सोन्याच्या लंकेची राजकन्या असलेल्या या मुलीचा भविष्यकाळ समजल्यानंतर लंकावासीयांसाठी ही श्रापित राजकन्या होते. तिला मारुन टाकण्याचे कट लंकेत शिजू लागतात. मात्र, मुलीवर अतोनात जीव असलेल्या रावणाला या भविष्यवाणीशी काहीही घेणंदेणं नसतं. मुलीसाठी तो लंकेलाही बळी चढवायला तयार होतं.

रावणाचं कन्येवरचं प्रेम एकदिवस लंकेला रसातळाशी नेणार याची प्रत्येकाला जाणीव असते. लंकेत मुलगी सुरक्षित नाही पुरेपूर कल्पना असलेला रावण आपल्या चिमुकल्या मुलीला पाठीशी गुंडाळून युद्धभूमीवर नेतो. लंकेपेक्षा युद्दभूमीवर, आपल्या नजरेसमोर मुलगी सुरक्षित राहिल अशी भाबडी आशा त्याला असते. मात्र इथेच खरा घात होतो. लंकेचा काळ ठरणाऱ्या या मुलीची युद्धभूमीवरच हत्या करण्याचा कट पुन्हा शिजतो आणि यावेळी तो काहीअंशी सफल होतो.

लंकेच्या हितासाठी रावणाचा सेवक भद्राकडे तिला मारण्याची मोहीम सोपवली जाते. मात्र त्या तान्ह्या, निष्पाप मुलीचं ते रुप पाहून भद्र भावनांच्या कोलाहलात सापडतो, मुलीला मारु की नाही या संभ्रमात जंगलात दूरपर्यंत आलेल्या भद्राला जंगलात जनक राजाच्या सैन्यांचा आवाज कानी पडतो. जीव वाचवून पळत सुटणाऱ्या भद्राच्या हातून रावणाची मुलगी पडते. तिला वाचवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण हे लक्षात आल्यावर तिला तिथेच टाकून भद्र लपून बसतो. ही मुलगी पुढे जनकाला मिळते आणि ती असुर कन्या नाही तर राजकन्या म्हणून वाढते. अशी रंजक गोष्ट असुरमध्ये आहे.

आपल्या मुलीचं सत्य बऱ्याच वर्षांनी रावणासमोर येतं. ही मुलगी म्हणजेच सीता होय. मात्र हे समजल्यानंतर रावण सीतेचं हरण का करतो? तो सीतेच्या स्वयंवरात नेमका का जातो? यासारख्या चक्रावून टाकणाऱ्या अनेक गोष्टींचे पदर यात उलगडले आहेत. 'असुर'चा प्रवास मृत्यूनंतर मुक्तीच्या शोधात निघालेल्या रावणापर्यंत येऊन संपतो. आतापर्यंतच्या कथेपेक्षा ही कथा नक्कीच वेगळी आहे कारण ही कथा रावण आणि त्याच्या पराजयाची आहे. महत्त्वाचं म्हणजे अगदी शेवटच्या पानापर्यंत ती थक्क करत जाणारी आहे. या पुस्तकाला वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता इंग्रजी व्यक्तीरिक्त मराठी, हिंदी आणि देशातील अनेक भाषेत हे पुस्तक भाषांतरीत करण्यात आलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला काही वेगळं वाचायचं असेल तर हे नक्कीच वाचू शकता. 

प्रतीक्षा चौकेकर 

pratiksha.choukekar@htdigital.in