पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रबोधन परंपरेचा वारकरी : डॉ. कल्याण गंगवाल

डॉ. कल्याण गंगवाल

शाकाहार आणि व्यसनमुक्तीच्या प्रचार-प्रसारासाठी गेली चार दशके अविरत कार्यरत असलेले डॉ. कल्याण गंगवाल आज, सोमवारी (२७ जानेवारी) ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. प्रबोधनाची परंपरा नुसती सांगून चालत नाही, तर ती पुढं न्यावी लागते. त्यासाठी वारकरी बनावे लागते, हे डॉ. गंगवाल यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिलं आहे. डॉ. गंगवाल यांनी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यात आणि देशात याबाबत उभारलेले कार्य प्रेरणादायी आहे.

--------------

पुण्यात अनेक सामाजिक चळवळी सुरू झाल्या असल्या, तरी त्यात बाहेरच्या जिल्ह्यांतून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या आणि तिथंच स्थायिक झालेल्या अनेकांचा वाटा आहे. डॉ. कल्याण गंगवाल हे त्यापैकीच एक. गंगवाल कुटुंबातील अनेक जण सध्याही कोपरगाव, पुणे, येवला परिसरात आहेत. डॉ. कल्याण गंगवाल हे ही शिक्षणासाठी पुण्यात गेले आणि गेल्या पाच दशकांत निष्णात डॉक्टरबरोबरच प्रबोधनाच्या परंपरेचा वारकरी बनून ते सातत्याने कार्यरत राहिले. शाकाहार, व्यसमनुक्ती आणि प्राण्यांच्या हक्कांसाठी त्यांनी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलेली चळवळ नुसतीच प्रेरणादायी नव्हे, तर अनेक मानदंड निर्माण करणारी ठरली आहे.  

काँग्रेसने PM मोदींना पाठवली संविधानाची प्रत

डॉ. गंगवाल यांनी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी मिळवली आणि मेडीसिन या विषयात प्रावीण्यही मिळवलं. बीजेत शिकत असताना पुणे विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या २५ पैकी २३ विषयांत डॉक्टरांनी सुवर्णपदक पटकावलं होतं! वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर प्रारंभीचा काही काळ त्यांनी केईएम रुग्णालयात काम केलं. या रुग्णालयात येणारे रुग्ण तपासतानाच त्यांच्या आर्थिक, सामाजिक स्थितीकडंही डॉक्टरांचं लक्ष गेले. ग्रामीण भागात गरिबीनं किती समस्या निर्माण होतात, हे त्यांनी अनुभवलं होतं. त्यातूनच त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता घडत गेला. गरीब रुग्णांवर मोफत उपचारांचा उपक्रम याच जाणिवेतून आकाराला आला आणि डॉक्टरांनी यात कधीच हात आखडता घेतला नाही. ग्रामीण भागातून शहरात गेले, तिथं स्थायिक झाले, की ग्रामीण भागाची नाळ तुटते. डॉ. गंगवाल यांनी ही नाळ कधीही तुटू दिली नाही. पुण्याबरोबरच कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर या भागातही त्यांनी असंख्य रुग्णांवर मोफत उपचार केले. तिथं वैद्यकीय शिबिरं घेतली. 

मेडीसिन ही वैद्यकीय क्षेत्रातील स्वतंत्र ज्ञान शाखा आहे. गेल्या चार दशकांत ती चांगलीच विस्तारली आहे. चार दशकांपूर्वीचं चित्र वेगळं होतं. याच वैद्यकीय ज्ञानाचा वापर करत त्यांनी अनेक रुग्णांच्या जीवनात आनंद फुलवला. एकीकडं व्यवसायात यशस्वी होत असतानाच डॉक्टरांनी आपली सामाजिक बांधिलकीही जपली. मुळात रोग होतातच का, त्याला माणसांच्या सवयी किती कारणीभूत ठरतात, यावरही डॉक्टरांनी चिंतन केलं. त्यातून बदलती जीवनशैली आणि चुकीच्या धारणांमुळे आजाराचं प्रमाण वाढत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यातून त्यांच्या कार्याचा श्रीगणेशा झाला. शाकाहार आणि व्यसनमुक्तीचं त्यांचं ध्येय त्यातूनच आकाराला येत गेलं आणि डॉक्टरांनीही नि:संकोचपणे त्यात स्वत:ला झोकून दिलं. डॉक्टरांनी शाकाहाराची चळवळ सुरू केली त्यामागं त्यांच्या या चिंतनाचा फार मोठा भाग होता. मांसाहारामुळे होणारे तोटे, आरोग्यावर होणारे परिणाम निष्णात डॉक्टर म्हणूनही ते अधोरेखित करू शकले. परंपरेला ज्ञानाची जोड देऊ देऊन शाकाहार हाच सर्वोत्तम आहार हा विचार रुजवू शकले. हा विचार रुजवताना त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. परंतु, त्यांनी आपले कार्य कधीच थांबवले नाही. व्यसनमुक्तीची चळवळ उभी करतानाही त्यांना या सर्वांना तोंड द्यावे लागलेच. तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही.

फक्त राज्यातच नाही, तर देश- विदेशातही त्यांनी शाकाहाराच्या प्रचार-प्रसाराचं काम केलं. आज जगभरात शाकाहाराचं महत्त्व समजलं आहे. डॉक्टरांच्या कामाची यापेक्षा वेगळी आणि सुंदर पावती कोणती असू शकेल? डॉक्टरांच्या या कार्याची दखल इंडियन व्हेजिटेरियन कॉंग्रेसनं दखल घेतली असून, टॉर्च बेअर ऑफ व्हेजिटरेनियम या शाकाहार प्रसाराच्या क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानानं त्यांचा सन्मान केला आहे. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी पुण्यासह राज्यातील निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची साखळी उभी केली. त्यातून व्यसनमुक्तीच्या प्रबोधनाला बळ आणि जोर दिला. गुटख्याला द्या झटका हे आंदोलन गावोगाव पसरत गेले आणि त्यातून तळागाळापर्यंत प्रबोधन घडलं. 

NZvIND T20: राहुल-श्रेयसची पुन्हा कमाल, भारताचा दुसरा विजय

माणसांबरोबरच पशूपक्ष्यांबाबतही डॉ. गंगवाल तेवढेच हळवे आहेत. त्यांनी प्राण्यांच्या हक्कांबाबतही नेहमीच ठाम भूमिका घेतली. त्यातून तुळजापूरमधील अजाबळी प्रथेला त्यांनी विरोध दर्शवला. पुणे जिल्ह्यासह इतरत्र होणाऱ्या बैलगाडा शर्यंतींनाही विरोध करत, या शर्यती बंद व्हाव्यात म्हणून सातत्यानं प्रयत्न केलं. या कामातही त्यांना मोठा विरोध सहन करावा लागला. आज प्राणी हक्कांबाबतही जी जागृती दिसते, त्यात डॉ. गंगवाल यांच्या या प्रयत्नांचा निश्चित वाटा आहे. बैलगाडा शर्यतींवर पुढं बंदी आली आणि ठिकठिकाणी बळी देण्याचे प्रकारही बंद होत गेले. डॉ. गंगवाल यांच्या कामाचं हे मोल कधीच विसरता येणार नाही. सामाजिक चळवळी इतरांच्या मदतीवर चालू शकत नाही. डॉ. गंगवाल यांनी यासाठी कधीच कुणाकडं हात पसरले नाहीत. आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातील मोठा हिस्सा त्यांनी या कार्यासाठी वर्ग केला. सर्वजीव मंगल प्रतिष्ठान ही संस्थाही उभारली. प्रबोधनाच्या परंपरेचा वारकरी असलेले डॉ. गंगवाल पंचाहत्तरीत पदार्पण करत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.