मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  अद्भुत, रम्य देश.. श्रीलंका!

अद्भुत, रम्य देश.. श्रीलंका!

HT Marathi Desk HT Marathi
May 30, 2024 05:16 PM IST

श्रीलंका! भारताचा दक्षिणेकडील छोटासा शेजारी देश. चोहोबाजूंनी समुद्रानेवेढलेला, निसर्गाने अपरंपार कृपा केलेला, सदैव चर्चेत असणारा भारताचा शेजारी!

Dr. Valsan Vethody, Consul General of Sri Lanka in Mumbai
Dr. Valsan Vethody, Consul General of Sri Lanka in Mumbai

 

ट्रेंडिंग न्यूज

-उमाकांत तासगांवकर

भारतीयांना जर पर्यटनाकरिता जायचे असेल तर श्रीलंकेसारखा स्वस्त आणि मस्त देश तुम्हांला मिळणे कठिणच! ज्यांना थोडक्यात परदेशी पर्यटन करायचे आहे त्यांच्यासाठी श्रीलंकेसारखा दुसरा पर्याय नाही. भारताचे आणि श्रीलंकेचे संबंध पार रामायण काळापासून आहेत हे आपल्याला माहित आहेच. आधुनिक श्रीलंका हे नवे आणि जुने याचा उत्तम मेळ घातलेला देश आहे. श्रीलंकेत गेल्यानंतर तुम्हांला प्राचिन मंदिरे तसेच आधुनिक मॉल्स, अत्याधुनिक कम्प्युटर्स आणि सायबर कॅफे, अत्याधुनिक हॉस्पिटल्स,उत्तम जागतिक दर्जाच्या तोडीची हॉटेल्स, आंतरराष्ट्रीय विमान सेवा या सर्वांचा लाभ घेता येईल. श्रीलंकन खाद्यपदार्थ हे भारतीयांसारखेच असतात आणि उत्तम दर्जाचे भारतीय जेवण, तसेच कॉन्टिनेंटल आणि चायनीज जेवण आपणांस मिळू शकेल.

श्रीलंकेत काय पहाल?

श्रीलंकेत पहाण्यासारख्या व अनुभवण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजधानी कोलंबो हे आंतरराष्ट्रीय हवाई सेवेने जगाशी जोडली गेलेली आहे. कोलंबोमध्ये प्रसिद्ध असे गंगाराम टेम्पल, कोलंबो टॉवर, कोलंबो पोर्ट, भारतीय पर्यटकांना आकर्षणाच्या दृष्टिने दुसरे ठिकाण म्हणजे रेडिओ सिलोनची इमारत. कोलंबो पोर्टचा परिसर मोठ-मोठया उंच इमारतींनी वेढलेला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह प्रमाणेच हा भाग म्हणजे श्रीलंकेचा मरीन ड्राईव्ह असून अत्यंत सुंदर भाग आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेत प्रदूषण अजिबात नाही.श्रीलंकेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे या देशात कुठेही फिरायला गेला तर निसर्गाचे अतिशय सुंदर आणि हिरवेगार रूप आपणांस पहायला मिळते.

श्रीलंका बेट असल्याने चारही बाजुंनी समुद्रकिनारे आहेत. तशीच या देशात अनेक बौद्ध मंदिरेही आहेत. श्रीलंकेतील ९० टक्के लोक हे बौद्ध धर्मिय आहेत. त्यामुळे येथे तुम्हाला ठिकठिकाणी भगवान बुद्धाची अनेक मंदिरे पाहता येतील. त्याच प्रमाणे सीता आम्मान मंदिर येथे रावणाने सीतेला ठेवले होते, असं म्हणतात. हनुमान हा सीतेला जेथे भेटला होता त्याच जागेवर हे मंदिर आहे. सीता हनुमंताला सोन्याची अंगठी देत आहे असे ही दृष्य आपल्याला पहायला मिळते. यामुळे हिंदू भाविकांची येथे बरीच गर्दी असते. बऱ्याच समुद्र किनाऱ्यावर, समुद्र तळाशी बोटीने जाण्याची सोय असते. समुद्र तळाचे विहंगम दर्शन आपणांस घेता येते. श्रीलंकेमध्ये सिगेरीया आणि दंबूल येथे अगदी जुन्या शतकातील अजिंठा लेण्यांची आठवण व्हावी अशा बौद्ध लेण्या आहेत. मात्र यासाठी आपणास बराच डोंगर चढून जावे लागते. श्रीलंकेमध्ये अनेक अभयारण्ये आहेत आणि त्यामध्ये अनेक प्राणी आणिसुंदर पक्षी सुखेनैव राहतात आणि आपल्याला पाहताही येतात.

Ancient rock fortress 'Sigiriya' is located in the northern Matale District near the town of Dambulla in Sri Lanka.
Ancient rock fortress 'Sigiriya' is located in the northern Matale District near the town of Dambulla in Sri Lanka.

 

त्रिंकोमाली येथे उत्तम समुद्र किनारा, हिंदू मंदिरे आणि श्रीलंकन नौदलाचे सुंदर म्युझियम आहे. अनुराधापूर येथे २००० वर्षापूर्वी बौद्ध गयाहून आणलेला बोधी वृक्षही पाहता येईल. बोधी वृक्षाची एक फांदी २००० वर्षापूर्वी श्रीलंकेत आणली गेली होती. आणि आज ते बौद्ध धर्मियांचे एक पवित्र स्थान आहे.

श्रीलंकेबद्दल भारतीयांच्या मनात आणि एकूणच परदेशी लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्रीलंका हा अत्यंत गरीब देश आहे. हा समज श्रीलंकेत पाऊल ठेवल्यानंतर दूर होतो. सध्या भारतीयांचा एक रूपया म्हणजे श्रीलंकेचे साधारण ३ रूपये आहेत. त्यामुळे भारतीय लोकांची श्रीलंकेत जाऊन बरीच चंगळ होते. श्रीलंकेत जाऊन खरेदी करणे हा भारतीय महिलांचा आवडता छंद आहे. उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय ब्रँन्डस् श्रीलंकेत उपलब्ध आहेत. भारतीयांना श्रीलंकेत जाण्यासाठी प्रवासपूर्व व्हिसा घ्यावा लागत नाही.

Bahirawakanda Vihara Buddha Statue, Kandy, Sri Lanka
Bahirawakanda Vihara Buddha Statue, Kandy, Sri Lanka (Image courtesy: Sri Lanka Tourism)

जागतिक मानव विकास निर्देशांक भारताचा क्रमांक १३४ वा आहे. तर चीनचा क्रमांक ७५ वा आहे.अमेरिकेचा क्रमांक २० वा आहे, तर श्रीलंकेचा क्रमांक ७८ वा आहे. चलनवाढ साधारण दीड टक्का आहे आणिदेशाचे क्षेत्रफळ ६५,६१० चौरस किलोमिटर आहे. श्रीलंकेची लोकसंख्या साधारण २२ कोटी तर साधारण बेरोजगारी ४.५० टक्क्यांपर्यंत आहे. २०२४ मध्ये पहिल्या तिमाहीत श्रीलंकेला सुमारे ६ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. त्यामध्ये चीन, युरोप आणि अमेरिकन पर्यटकांचाही समावेश होता. श्रीलंकेत साधारण ३२ दशलक्ष मोबाईल्स आहेत. श्रीलंकेत फिरत असताना तुम्हाला गरीब सहसा दिसत नाहीत. उलट ग्रामीण भागात देखील उत्तमोत्तम बंगले दिसतात. सुमारे ७५० भारतीय कंपन्या श्रीलंकेत काम करतात. त्यामुळे सुमारे २५०० भारतीय अधिकारीसध्या श्रीलंकेत काम करत आहेत.

ब्रॅन्टीक्स टेक्टाईल्स कंपनीने सुमारे १ अब्ज डॉलर्स एवढे गुंतवून भारतात विशाखापट्टणम येथे त्यांचा टेक्टाईल्स प्लांट चालू केलेला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्षालासुमारे ५ अब्ज डॉलर्सची आयात -निर्यात होते. मात्र यामध्ये ४.९० भारत श्रीलंकेला मोठी निर्यात करतो. श्रीलंकेतून भारतात होणारी आयात ही फारच कमी आहे. दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना भारतात शिष्यवृत्ती दिली जाते. ५ हजार श्रीलंकन विद्यार्थी हे भारतात शिक्षण घेत आहेत.चीनने श्रीलंकेमध्ये ५७०६ किलोमिटर लांबीची पोर्ट सिटी विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

भारत आणि श्रीलंकेचा राजकीय आणि सामाजिक संबंध जरी चांगले असले तरी यात कधीतरी चढउतार होत असतात. भारताने वेळोवेळी मोठया भावाची भूमिका बजावून श्रीलंकेला मदत केली आहे. उदा. १९७१ मध्ये श्रीलंकन नौदलाने बंड केले होते. त्यावेळी भारत हा श्रीलंकन सरकारच्या मदतीला धावून गेला होता. त्याच प्रमाणे सन २००४ साली जेव्हा त्सुनामीचे संकट आले त्यावेळी भारताने श्रीलंकेला मोठी मदत केली होती. सन २००९ साली जेव्हा श्रीलंकेत दहशतवाद वाढला त्याही वेळेस भारताने श्रीलंकेला मोठया प्रमाणात वैद्यकिय मदत केली होती. साधारण दीड वर्षापूर्वी श्रीलंकेमध्ये परदेशी चलनाचे संकट आले होते. त्यावेळी भारताने श्रीलंकेला सुमारे ४ अब्ज डॉलर्सची मदत केली होती.

सद्या माध्यमांनी श्रीलंकेमध्ये अर्थिक संकट फार असल्याची ओरड केली आहे. परंतु आजही युनोच्या भूक निर्देशांकानुसार १२१ देशांमध्ये श्रीलंकेचा नंबर ६४ आहे आणि भारताचा १०७ आहे. आजही श्रीलंकन नागरिकांची खरेदी क्षमता जवळजवळ १४,४०५ डॉलर्सच्या आसपास आहे. तर भारताची जास्तीत जास्त ८३८० डॉलर्स आहे.

मुंबई मधील श्रीलंकेचा वाणिज्य दूतावास अतिशय कार्यक्षम आहे. श्रीलंकेचे मुंबईतील वाणिज्य दूत डॉ. वल्सन वेथोडी हे अतिशय वरिष्ठ राजनायिक आणि विशेषकरून भारत आणि आशियातील राजकारणाचे उत्तम जाणकार आहेत. विशेष म्हणजे दूतावासातील सुमारे ३० ते ३५ वर्ष काम केलेले तृतीय वा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जमेल तसे आठ दिवासांकरिता श्रीलंकेला पाठवून त्या देशाचे दर्शन घडवले होते, याचे मला कौतुक वाटते. ज्या लोकांना माझ्या देशाबद्दल काम करायवाचे आहे, त्यांनात्या देशाची चांगली माहिती असली पाहिजे म्हणजेच ते उत्तम काम करतील ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे दूतावासातील सर्व कर्मचारी हे एक कुटुंब असल्यासारखेच काम करताना दिसतात. हे मी स्वतः अनुभवले आहे.

 

Jungle Beach at Rumassala, Sri lanka
Jungle Beach at Rumassala, Sri lanka

भारत-श्रीलंकेदरम्यानचा कच्छतिवू बेटाचा वाद नेमका काय आहे?

मी त्यांना नुकत्याच वादात आलेल्या कच्छतिवू बेटा बद्दल विचारले. त्या बद्दल ते म्हणाले सन १९७४ साली भारत आणि श्रीलंकेने आपल्या समुद्री सीमा निश्चित केल्या. त्या वेळेस सदर बेट हे श्रीलंकेच्या हद्दीत गेले. आता ते भारतातयेऊन भारताला त्याचा फारसा फायदा होईल असे मला वाटत नाही. कच्छतिवू बेट हे रामसेतूच्या जवळ आहे आणि ते निर्मनुष्य आहे. आकाराने खूपच छोटे आहे.

श्रीलंका हा देश जगभरात उत्तम दर्जाचे वेलदोडे, लवंग, मोठे वेलदोडे इत्यादी मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. जगातील सर्वोत्कृष्ट दालचिनी ही श्रीलंकेत पिकते.उत्तम तर्हेचे हिरे हेही श्रीलंकेत मोठया प्रमाणात मिळतात. हिऱ्यांचा जागतिक व्यापार होतो. भारतापेक्षा थोडया स्वस्त दरात हिरे आपल्याला श्रीलंकेत मिळतात. श्रीलंका हा लोकशाही प्रधान देश आहे. श्रीलंकेत या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये सार्वजनिक निवडणूका होणार आहेत. निवडणूका किती खर्चिक असतात हे आपल्याला माहितच आहे.

(लेखक उमाकांत तासगावकर हे गेली अनेक वर्ष पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. भारताचे विविध देशांशी असलेले व्यापारी, सांस्कृतिक, पर्यटन तसेच शैक्षणिक संबंध या विषयावरचे ते भाष्यकार आहेत)

WhatsApp channel