Home remedies to get rid of blemishes on face: प्रत्येक व्यक्तीसाठी आपला चेहरा प्रचंड खास असतो. त्यामुळे चेहऱ्याची विशेष काळजी आपण घेत असतो. परंतु स्किन केअर करूनसुद्धा बऱ्याचवेळा पुरळ उठतात. आणि त्याचे चेहऱ्यावर नंतर डागदेखील पडतात. तुमच्याही त्वचेवर दिसणाऱ्या डागांमुळे तुम्हीही हैराण आहात का? यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत आहे का? असं असेल तर काळजी करू नका. अशी अनेक आवश्यक तेल आहेत जी तुम्हाला हे डाग कमी करण्यात मदत करू शकतात. त्वचेवर आवश्यक तेलाचा नियमित वापर करा, काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील डागांमध्ये फरक दिसेल. या उपायात सातत्य राखल्याने तुम्हाला नितळ आणि चमकदार त्वचा मिळू शकते.
टी ट्री ऑइल म्हणजेच चहाच्या झाडापासून बनवलेले तेल होय. हे तेल त्वचेचे संक्रमण आणि जखमा बरे करण्यास मदत करते. याशिवाय डाग आणि सुरकुत्यासुद्धा कमी करतात. हे डागांवर किंवा त्वचेवरील बॅक्टेरियांची वाढ नष्ट करते, ज्यामुळे डाग हळूहळू नाहीशे होतात. मी[पीपल्स किंवा इतर कोणत्याही कारणामुळे चेहऱ्यावर पडणारे काळे डाग आणि सुरकुत्यांचा धोका कमी होतो.
रोझमेरी ऑइल आपल्या शरीरात रक्त संचरण वाढवते. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत करतात. बॅक्टेरियाच्या वाढीमुळे त्वचेवर डाग येऊ शकतात. अशा परिस्थितीत, रोझमेरी ऑइल डाग नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. फायटोन्यूट्रिएंट्स फ्री रेडिकलशी संबंधित नुकसान आणि हायपरपिग्मेंटेशनशीदेखील लढतात.
हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन नावाचे सक्रिय संयुग एक शक्तिशाली अँटी-इंफ्लेमेटरी आहे. आयुर्वेदिक चिकित्सकांनी त्वचेचा रंग सुधारण्यासाठी, मुरुम आणि डाग टाळण्यासाठी तसेच हायपरपिग्मेंटेशनसाठी याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. हे मेलेनिनचे अतिरिक्त उत्पादन कमी करते असे मानले जाते. त्यामुळे चेहऱ्यावरील डागांसाठी हळदीचे तेल उत्तम आहे.
लोक सामान्यतः तणाव आणि नैराश्याच्या काळात स्वतःला शांत करण्यासाठी आणि शांत झोपेसाठी लॅव्हेंडर तेल वापरतात. हे तेल लॅव्हेंडर वनस्पतीच्या फुलांपासून आणि पानांपासून मिळते. जेव्हा लॅव्हेंडर तेल जखमांवर लावले जाते तेव्हा हे तेल नवीन ऊतकांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि त्या भागातील डागसुद्धा हलके करते. त्यामुळे तुमच्याही चेहऱ्यावर जर मुरुमांचे किंवा इतर कोणतेही डाग असतील, तर लॅव्हेंडर तेल तुम्ही वापरू शकता.
पेपरमिंट ऑइलमध्ये अँटिसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आढळतात. ज्यामुळे त्वचेवर दिसणारे डाग नैसर्गिकरित्या कमी होतात. या व्यतिरिक्त, मुरुमांच्या डागांमुळे सूज आणि खाज सुटते. अशावेळी या ऑईलमध्ये त्वचेला थंड करण्याचे गुणधर्म आहेत. पेपरमिंट ऑइल मेलेनिनचे उत्पादन नियंत्रित करते. जे डाग कमी करण्यास मदत करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)