Mistakes to Avoid in Daily Skin Care Routine: सध्या सोशल मीडियावर कित्येक सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्सकडून स्किन केअर टिप्स सुचविल्या जातात. या टिप्स पाहताना खुप आकर्षक आणि सोप्या वाटतात. त्यामुळे त्या करुन पाहण्याचा मोह आवरता येत नाही. परंतु या गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. हे लक्षात ठेवा की प्रत्येकाची त्वचा भिन्न असते आणि जे इतरांच्या त्वचेवर उत्तम प्रकारे कार्य करते ते आपल्यासाठी देखील तितकेच प्रभावी ठरेल असे नाही. शरीफा स्किन केअर क्लिनिकच्या त्वचाविकार तज्ज्ञ आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. शरीफा चौसे यांनी रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये कोणत्या गोष्टी करु नये किंवा कोणत्या चुका टाळाव्या हे सांगितले.
लोक DIY हॅक वापरुन घरच्या घरी स्कीन केअर रुटीन फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. यापैकी बऱ्याचशा ब्युटी हॅकमध्ये लिंबाचा रस वापरला जातो. लिंबू व्हिटॅमिन सी समृद्ध आहे आणि त्यात काही त्वचा उजळणारे गुणधर्म आहेत. परंतु ते थेट चेहऱ्यावर लावणे ही एक मोठी चूक ठरु शकते. लिंबाचा रस थेट तुमच्या त्वचेवर लावल्याने तुमची त्वचा संवेदनशील होऊ शकते. ज्यामुळे त्वचा लालसर होऊ शकते.
मुरुमांवर उपचार करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर टूथपेस्ट लावणे योग्य नाही. टूथपेस्ट ही विविध रसायने वापरून बनवली जाते आणि ती केवळ दातांवर वापरली जाऊ शकते, चेहऱ्यावर नाही. टूथपेस्टमध्ये फ्लोराईड, ॲब्रेसिव्ह आणि मेन्थॉल सारखे घटक असतात, जे तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम करु शकतात आणि पुरळ तसेच एलर्जी निर्माण करतात. टूथपेस्टमध्ये आढळणारी अल्कोहोलयुक्त सामग्री तुमची त्वचा कोरडी करू शकते. ज्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल नष्ट होते. तुमच्या त्वचेवर टूथपेस्ट लावल्याने तुम्हाला फायद्यापेक्षा जास्त नुकसानच होऊ शकते.
लोक सहसा हे विसरतात की जास्त एक्सफोलिएशनमुळे ब्रेकआउट आणि त्वचेचे नुकसान होऊ शकते. ते दररोज करू नये. एक्सफोलिएशन ही विविध रासायनिक उत्पादने वापरून तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. हे स्क्रब तुमची त्वचा कोरडी करू शकतात. परिणामी त्वचेचे नुकसान, निस्तेज त्वचा, त्वचेचा लालसरपणा, त्वचेवर पुरळ येणे आणि खाज सुटू शकते.
किम कार्दशियनने मायक्रोनेडलिंग उपचार घेतल्याने मायक्रोनीडलिंगला अचानक प्रसिद्धी मिळाली. हे कमीत कमी आक्रमक उपचार तुम्हाला तुमची त्वचा टाइट करण्यास मदत करते. ज्यामुळे ती तेजस्वी आणि नितळ दिसते. त्याच्या लोकप्रियतेमुळे विविध ब्रँड्सने घरी मायक्रोनेडलिंग किट तयार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे उपचार योग्य प्रकारे न केल्यास त्वचेचे नुकसान आणि संसर्ग होऊ शकतो. त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय उपचार करु नका.
आपले सौंदर्य वाढवण्यासाठी नवीन हॅक किंवा ट्रेंड वापरून पाहण्यापुर्वी ते तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे का हे पहावे. तुमच्या त्वचेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ते थेट तुमच्या त्वचेवर लावण्यापूर्वी प्रत्येक संबंधीत उत्पादनांची पॅच टेस्ट करणे योग्य राहिल. काही उत्पादने लावल्यानंतर तुमची त्वचा कशी प्रतिक्रिया देते याकडे बारकाईने लक्ष द्या. तुम्हाला एलर्जीचा त्रास जसे की जळजळ होणे, खाज येणे, पुरळ उठणे यासारखी लक्षणे उद्भवल्यास त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)