Prevention for Skin Cancer In Young Age: जगभरातील कोट्यावधी लोकांना भेडसावणारा आजार म्हणजे त्वचेचा कॅन्सर. जरी तो भारतात सर्वसाधारणपणे दिसून येत नसला तरी अन्य देशात तो अधिक प्रमाणात आढळतो. आपल्याला सूर्याच्या घातक यूव्ही किरणांपासून आपल्या त्वचेचा बचाव करणे आवश्यक असते. जरी त्वचेचा कॅन्सर वर्षातील कोणत्याही काळात होत असला तरीही हे महत्त्वाचे आहे की आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यावी. त्वचेचा कॅन्सर हा साधारणपणे वयोमानाशी संबंधित आजार असला तरीही आता तो अधिक प्रमाणात तरुणांमध्येही दिसून येऊ लागला आहे. मेलानोमा हा त्वचेच्या कॅन्सरचा एक प्राणघातक प्रकार आहे. म्हणूनच याच्या वाढत्या केसेस काळजी निर्माण करतात. बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलचे कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजी डॉ. राहूल वाघ यांनी त्वचेच्या कर्करोगाची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय सांगितले.
अल्ट्राव्हॉयलेट (यूव्ही) किरण अधिक प्रमाणात त्वचेवर विशेष करुन सूर्यकिरणे त्वचेवर पडल्यामुळे हा आजार होऊ शकतो. यूव्ही किरणांमुळे त्वचेच्या पेशींवर परिणाम होऊन त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. त्वचा काळी पडण्यामुळे धोका वाढतो आणि यूव्ही किरणांचा धोका वाढतो. मग घराबाहेरचे किरण असो किंवा टॅनिंग बेड मधील असोत.
तरुणांमध्ये विशेषकरुन टॅनिंग बूथ मध्ये जे नियमितपणे जात असतात त्यांना हा धोका अधिक असतो. अशा उपकरणांमधील फोकस्ड अशी ही यूव्ही किरणे असल्याने ते किरण हे सूर्य किरणांपेक्षा घातक असतात. त्यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा अधिक धोका असतो विशेषकरुन मेलनोमा हा जीवघेणा आजार होऊ शकतो. हा धोका नियमितपणे टॅनिंग बेड्सचा वापर करतात अशा व्यक्तींना अधिक प्रमाणात असतो.
ज्या लोकांमध्ये त्वचेच्या कॅन्सरचा अनुवांशिक इतिहास आहे अशांना हा आजार अनुवांशिकतेने होतांना आढळतो.
कॅन्सरच्या पेशींशी शरीराची लढण्याची शक्ती कमी असणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणार्या व्यक्ती, विशेष करुन अवयव बदल केलेल्या व्यक्ती किंवा जे एचआयव्ही/एड्स सह जगत आहेत अशांना त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.
- त्वचेवर तसेच रक्तवाहिन्यांमध्ये दिसून येणारा मोत्यासारखा किंवा मेणासारखा व्रण
- सपाट, त्वचेच्या रंगाची किंवा तपकिरी रंगाची जखम
- वारंवार होणारे व्रण, बरे होऊन काही काळानंतर पुन्हा होतात.
- टणक, लाल नोड्यूल
- खवलेयुक्त आणि सपाट असे फोड
- नवीन वाढलेल्या किंवा सूज आलेल्या बर्या न होणार्या जखमा
- सध्या असलेल्या तिळाचा आकार, रंग बदलणे किंवा नवीन तीळ निर्माण होणे
- त्वचा नवीन ठिकाणी काळी पडणे किंवा अनैसर्गिक अशी त्वचेची वाढ होणे
- तीळाच्या आकारात अनियमितता येणे
- तिळाला अनियमित किंवा दातेरी अशी बॉर्डर निर्माण होणे
- तिळाचा रंग बदलणे (तपकिरी, काळा, टॅन, लाल, पांढरा किंवा निळा)
- कालानुरुप तिळाच्या आकारात वाढ होणे (आकार वाढणे, बदलणे किंवा उंचीत बदल होणे)
त्वचेचा कॅन्सर होण्यापासून बचाव करतांना सूर्यप्रकाशापासून बचाव करणे आवश्यक असते, म्हणजेच यामध्ये एसपीएफ ३०+ चे सनस्क्रीन, सुरक्षा देणारे कपडे वापरणे, सावलीत राहणे आणि टॅनिंग बेड्सचा वापर टाळणे यांचा समावेश आहे. त्वचेची नियमित तपासणी केल्यामुळे रोगाचे निदान लवकर होण्यास मदत होते. आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा वापर करणे जसे समतोल आहार आणि धुम्रपान न करणे यामुळेही त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
त्वचेच्या कॅन्सरवरील उपचारांमध्ये सर्जरी करुन तो भाग काढून टाकणे, मोहज मायक्रोग्राफिक सर्जरी मुळे अचूकपणे हे काम करता येते. याव्यतिरिक्त रेडिएशन थेरपी, केमोथेरपी (कमी वापरली जाते), इम्युनोथेरपी या उपायांचा वापर केला जाऊ शकतो. टार्गेटेड थेरपी मध्ये काही गंभीर स्थिती मध्ये विशिष्ट जनुकीय समस्यांवर इलाज केला जातो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)