Shravan 2024: हिंदू धर्मातील पवित्र महिना असणाऱ्या श्रावण महिन्याला नुकतंच सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. हा महिना खासकरून महादेवाला अर्पण करण्यात आला आहे. शिवाय या महिन्यात प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो. काल पहिला श्रावणी सोमवारचा उपवास ठेवण्यात आला होता. श्रावण महिन्यात अनेक गोष्टी काळजीपूर्वक पाळाव्या लागतात. त्यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे मांसाहार वर्ज्य करणे. याकाळात मांसाहार पूर्णपणे टाळला जातो. यामागे धार्मिक महत्व आहे. पूजापाठ करताना असे पदार्थ अशुभ आणि वर्ज्य मानले जातात. परंतु यामागे मोठे वैज्ञानिक कारणदेखील आहे. अनेकांना अद्याप माहिती नाही.
हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील भोजनाशी संबंधित अनेक नियम आहेत. या महिन्यात मांसाहार तर वर्ज्यच असते शिवाय, श्रावण महिन्यात काही ठिकाणी कढी, दही, कप्पे असलेल्या हिरव्या पालेभाज्या वगैरे न खाण्याचा नियम आहे. बहुतेकदा काही लोक या अन्न पद्धतींना केवळ विशिष्ट धार्मिक नियम मानून त्यांचे पालन करत नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का की, श्रावणामध्ये जेवणाबाबत असलेल्या या नियमांमागे मोठे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. ते कारण नेमके काय आहे त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मातील पवित्र असणारा श्रावण हा पावसाळ्याचा महिना आहे. विज्ञानानुसार, याकाळात सूर्यप्रकाश कमी वेळ टिकतो. पावसामुळे सर्वत्र आर्द्रता आणि गारवा वाढतो. त्यामुळे आपली पचनशक्ती नेहमीपेक्षा अधिक कमजोर होते. मांसाहार पचायला जास्त वेळ लागतो. आहार तज्ज्ञांच्या मते, आपल्या पचनाचे दोन प्रकार असतात. या प्रकारात सम अग्नी आणि मंद अग्नी यांचा समावेश होतो . समा अग्निमध्ये शरीराला अन्न पचायला ५ ते ६ तास लागतात. तर मंद अग्नीमध्ये अन्न पचायला ७ ते ८ तास लागतात. कमकुवत पचनशक्तीमुळे मांसाहारी अन्न आतड्यांमध्ये तसेच राहून सडण्यास सुरुवात होते.
अशा स्थितीत श्रावण महिन्यात जड अन्न शरीराला पचणे कठीण होते. त्यामुळे श्रावण महिन्यात शाकाहारी अन्न खाणे चांगले असल्याचे मानले जाते. केवळ मांसाहारीच नव्हे तर, अनेक शाकाहारी पदार्थही जे सहज पचत नाहीत, ते या ऋतूत खाण्यास मनाई आहे.
इतर ऋतुंपेक्षा श्रावण महिन्यात पावसाळा असल्याने पाण्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. म्हणूनच मासे खाण्यास मनाई आहे. किंबहुना, संक्रमित किंवा प्रदूषित पाण्यावर अवलंबून असलेले जीव खाल्ल्याने आरोग्यावर अनेक संसर्ग होण्याचा धोका असतो. यासोबतच वातावरणातील आर्द्रता वाढल्याने संसर्ग पसरण्याची भीती अधिक वाढते. हा संसर्ग जनावरांनाही होऊ शकतो. अशा परिस्थितीत जनावरांना होणारा संसर्ग टाळण्यासाठी मांसाहार टाळणे चांगले. असे वैज्ञानिक मत आहे.
पावसाळा हा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांसाठी प्रजनन काळ असतो. जर तुम्ही या ऋतूत हे प्राणी खाल्ले तर तुम्ही त्यांच्या प्रजनन प्रक्रियेतही व्यत्यय आणता. आयुर्वेदानुसार, श्रावण महिन्यात व्यक्तीची पचनक्रिया मंद राहते, अशा स्थितीत कढी पचण्यासअडचण येऊ शकते. शिवाय वातची समस्याही वाढू शकते. श्रावण महिन्यात कारले, वांगी, मुळा, फणस, मांस, मासे, दही यासह अन्य काही पदार्थ खाण्यास मनाई आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)