Shravan Recipes: श्रावण सोमवारचा उपवास ठेवताय? झटपट बनवा साबुदाणा बासुंदी-shravan 2024 recipes of sweets that can be eaten during fasting ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shravan Recipes: श्रावण सोमवारचा उपवास ठेवताय? झटपट बनवा साबुदाणा बासुंदी

Shravan Recipes: श्रावण सोमवारचा उपवास ठेवताय? झटपट बनवा साबुदाणा बासुंदी

Aug 04, 2024 12:05 PM IST

Sweet Recipes For Shravan: महाराष्ट्रात उद्यापासून श्रावणाला सुरुवात होत आहे. अर्थातच ५ ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवारचा उपवास असणार आहे. उपवास असल्याने अनेकांना ताकद राहण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी काय खावे हा प्रश्न पडलेला असतो.

Shravan Recipes
Shravan Recipes

Shravan Recipes: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात कोणते ना कोणते सण-उत्सव साजरे केले जातात. कारण प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवाला अर्पण केलेला असतो. त्यामुळेच हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण हा महिना भगवान शिवला अर्पण करण्यात आला आहे. या महिन्यात लोक महादेवाची मनोभावाने भक्ती करतात. दररोज पूजापाठ करतात. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी हे लोक उपवास ठेवतात. या दिवशी उपवास करून महादेवाला प्रसन्न केले जाते. शिवाय या महिन्यात आहारात विविध पदार्थ वर्ज्य करण्यात येतात. आणि जे पदार्थ खाल्ले जातात त्यापासून विविध नवनवीन पदार्थ बनवले जातात. त्यामुळेच आज आपण एक खास रेसिपी पाहणार आहोत.

महाराष्ट्रात उद्यापासून श्रावणाला सुरुवात होत आहे. अर्थातच ५ ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवारचा उपवास असणार आहे. उपवास असल्याने अनेकांना ताकद राहण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी काय खावे हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळेच आहे त्याच पदार्थांपासून आपण काही नवीन पदार्थ बनवू शकतो. तुम्हीही प्रत्येक श्रावणात तेच तेच पदार्थ पाहून खाऊन कंटाळलेला असाल तर, तुम्हाला आज आम्ही एक फारच इंटरेस्टिंग रेसिपी सांगणार आहोत. उपवासात खाल्ला जाणार महत्वाचा पदार्थ म्हणजे शाबू होय. आज आपण साबुदाण्यापासूनच एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. त्या पदार्थचं नाव आहे 'साबुदाणा बासुंदी'. याची रेसिपी फारच सोपी आहे. विशेष म्हणजे अगदी कमी साहित्यात हा पदार्थ बनवता येतो. पाहूया साहित्य आणि रेसिपी...

 

साहित्य

-दूध- १ लीटर (फुल क्रीम)

-साबुदाणा- १/४ कप

-साखर- १५० ग्राम

-ड्रायफ्रूट्स- १/४ कप (काजू, बदाम, पिस्ता)

-इलायची- दीड टेबल स्पून

-केसर- ४-५ काड्या

 

साबुदाणा बासुंदी रेसिपी-

खीर बनवण्याच्या अर्धा तास आधी साबुदाणा स्वच्छ धुवून भिजत ठेवा. त्यांनंतर एका खोलगट भांड्यात दूध घेऊन गॅसवर उकळत ठेवा. एका बाजूला थोडेसे गरम दूध एका वाटीत काढून त्यात केसरच्या काड्या भिजत ठेवा. आता उकळलेल्या दुधात भिजवत ठेवलेला साबुदाणा घालावा. त्यानंतर तो दुधात चांगला शिजवून घ्यावा. लक्षात ठेवा शाबू शिजवत असताना गॅस मंद आचेवर ठेवा. अथवा तळाला लागण्याची शक्यता असते.

साबुदाणा काचेप्रमाणे चकाकेपर्यंत तो शिजवत राहा. शिजल्यानंतर त्यामध्ये वर घेतलेल्या प्रमाणात साखर घाला. साखर घालून सर्व मिश्रण दुधात एकजीव करा. त्यांनंतर गॅस बंद करा. आता यामध्ये घेतलेले बदाम, काजू, पिस्ता यांसारखे उपवासाला चालणारे ड्रायफ्रूट्स घाला. शिवाय वरून केसरचे दूध त्यात टाका. ही बासुंदी पुन्हा हलवून एकजीव करा. अशाप्रकारे तयार आहे उपवासात खाता येणारी साबुदाण्याची बासुंदी.