Sex Education For Kids: आजच्या मुलांना आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पालकांवर अवलंबून राहावे लागत नाही. सोशल मीडियाशी मैत्री करून त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी क्षणार्धात मिळतं. त्यामुळे आजकालची मुले आपल्या वयापेक्षा फारच हुशार बनली आहेत. परंतु एक पालक म्हणून, आपण हे देखील मान्य केले पाहिजे की सोशल मीडियावरील सर्वच प्रकारची माहिती आपल्या मुलासाठी प्रत्येक बाबतीत सुरक्षित नसते. अशा वेळी मुलांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने योग्य माहिती मिळाली नाही तर ते चुकीच्या वाटेवर जातात. विशेषत: लैंगिक शिक्षणाचा अर्थातच सेक्स एज्युकेशनचा विचार केला तर बहुतेक पालक स्वत: आपल्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु सेक्स एज्युकेशनची सुरुवात घरातून झाली तर आपला मुलगा किंवा मुलगी चुकीच्या वाटेवर जाण्याचा धोका निश्चितच खूप कमी होतो. आपल्या मुलाला लैंगिक शिक्षण कधी आणि कसे द्यायचे, असा प्रश्न अनेक पालकांना पडला असेल. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की, आपल्या मुलाशी सेक्सबद्दल संभाषण सुरू करणे हा त्यांच्या विकासाचा एक संवेदनशील आणि महत्वाचा पैलू आहे. लैंगिक शिक्षण ही एकवेळची गोष्ट नसून सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे प्रत्येक पालकाने समजून घेतले पाहिजे. जसजसे तुमचे मूल मोठे होते आणि त्यांची समज वाढत जाते. मुलांच्या वाढत्या वयानुसार पालकांनी त्यांच्याशी या विषयावर बोलण्याची तयारी ठेवणे, प्रामाणिकपणे प्रश्नांची उत्तरे देणे आणि त्यांची माहिती समजून घेण्याची तयारी असणे गरजेचे आहे.
वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना लैंगिक शिक्षणाची ओळख करून द्यायला सुरुवात करायला हवी. या वयोगटातील मुलांना 'गुड टच' आणि 'बॅड टच'बाबत समजावून सांगा. प्रायव्हेट पार्ट्सची सुरक्षितता आणि त्याच्याशी संबंधित जोखीम याविषयी माहिती देताना प्रत्येक गोष्ट पालकांसोबत शेअर करण्याचा सल्ला त्यांना द्या. अशाने मुलांबाबत घडणाऱ्या घटना तुम्हाला लक्षात येतील.
या वयाची मुले अधिक शहाणी झालेली असतात. त्यामुळे त्यांना काहीही गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करण्यापेक्षा खरी वस्तुस्थिती सांगा. मुलांनी आपल्या जन्माशी संबंधित प्रश्न विचारले असता परी खाली आली आणि तुम्हाला आपल्याजवळ सोडून गेली, असे सांगून त्यांना फसवू नका. त्याऐवजी मुलांना समजावून सांगा की, मूल जन्माला येण्यासाठी शुक्राणू आणि पेशी या दोन्हींची गरज असते, जी त्याला त्याच्या आई-वडिलांकडून मिळते.
दहाव्या वर्षात पालकांनी मुलांबद्दलचा संकोच कमी केला पाहिजे. आजकाल बलात्कार, शारीरिक शोषणसारख्या बातम्या दररोज टीव्ही आणि वर्तमानपत्रांवर दिसणे ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. अशावेळी मुलाने तुम्हाला या विषयांशी संबंधित कोणताही प्रश्न विचारला तर तो टाळण्यापेक्षा त्याचे गांभीर्य त्यांना समजावून सांगा. त्यामुळे मुलांमध्ये जागृती निर्माण होईल. संकटाच्या काळात त्यांना योग्य मार्ग निवडणे सोपे जाईल.
या वयापर्यंत मुलाला मिळालेले अर्धवट लैंगिक शिक्षणही त्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी मुलाशी मनमोकळेपणाने बोला जेणेकरून मुलांच्या मनात काय चालले आहे हे कळेल आणि तुम्ही वेळीच मूल बिघडण्यापासून रोखू शकाल. शिवाय त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक बदल त्यांना लक्षात येऊन स्वतः च्या भावनांवर ताबा ठेवण्यास मदत मिळेल.
मुलांना सेक्सबद्दल बोलण्यासाठी मोकळे वातावरण द्या. जिथे आपल्या मुलास प्रश्न विचारणे आणि संवेदनशील विषयांवर चर्चा करणे सोयीस्कर वाटू शकते. लाजिरवाणी किंवा निर्णयाची भीती न बाळगता ते या विषयावर आपले मत मांडू शकतील याची त्यांना खात्री द्या. त्यांना स्वतःहून काही गोष्टी लक्षात आणून द्या. जेणेकरून ते स्वतःही उघडपणे काही गोष्टी शेअर करतील. शिवाय बाहेर वावरताना, शाळेत, नातेवाइकांकडून काही त्रास होत असेल तर ते बोलण्याची मुभा आणि धैर्य त्यांना द्या. जेणेकरून आपली मुले कोणत्याही घटनेला बळी पडणार नाहीत.
संबंधित बातम्या