Reasons Selfies Can Be Good For Health: प्रत्येक खास क्षण जपण्याच्या इच्छेने लोक भरपूर फोटो काढत असतात. आजकाल लोकांना सेल्फीचे तर वेडच लागले आहे. मान थोडी तिरकी करून, आपला डबल चीन लपवून, मोबाईल थोडा वर पकडून फोटो क्लिक केल्यानंतर, या फोटोवर अनेक प्रकारचे फिल्टर टाकून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सेल्फीची कहाणी पूर्ण होते. मात्र, सेल्फीचे हे वेड जास्त वाढले, तर मानसशास्त्रज्ञही त्याला मानसिक विकाराचे नाव देऊ लागतात. परंतु, कधीकधी आयुष्यात नवीन रंग आणि उत्साह जोडण्यासाठी ‘सेल्फी’ हा एक चांगला पर्याय असू शकतो. सायकॉलॉजी ऑफ वेलबीइंगमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार 'सेल्फीमुळे तुमचा मूड चांगला होऊन, त्याचा शारीरिक आणि मानसिक फायदा होतो'. जाणून घेऊया सेल्फी काढण्याचे भन्नाट फायदे…
सेल्फी हा प्रकार सोशल मीडियावर सर्वात जास्त शेअर केल्या जाणाऱ्या फोटोंपैकी एक आहे. सोशल मीडियावर सेल्फी शेअर केल्याने लोकांना आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची संधी मिळते. सेल्फी आपल्याला सोशल मीडियाच्या जगाशी जोडण्यास मदत करतो. सोप्या शब्दात सांगायचे तर सेल्फी आपल्याला सामाजिक बनवते.
सेल्फी आपल्या आठवणी आणि खास क्षण जपण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. भूतकाळात हरवलेले हे क्षण पाहून माणसाच्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ज्यामुळे मनात सकारात्मक भावना निर्माण होतात. चांगल्या आठवणी टिपून, मागे वळून बघून चांगलं वाटण्याचा सेल्फी हा एक उत्तम मार्ग आहे.
आपलं मानसिक आरोग्य राखण्यासाठी व्यक्तीनं स्वत:वर प्रेम करणं खूप गरजेचं आहे. प्रियव्यक्तींकडून प्रेमाची अपेक्षा करणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु, आपण प्रथम स्वत: वर प्रेम करण्यास शिकले पाहिजे. सेल्फी घेतल्याने व्यक्तीमध्ये स्वत:वर प्रेम करण्याची भावना वाढते, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक सेल्फी घेतात ते सेल्फी न घेणाऱ्या लोकांपेक्षा अधिक आत्मविश्वासू असतात आणि त्यांना अधिक आकर्षक वाटते.
सेल्फी घेतल्याने तुमचा उत्साह तर वाढतोच, शिवाय व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित फायदेही मिळतात. यूकेच्या संशोधनानुसार, ज्या लोकांना सेल्फी घेण्याची आवड असते त्यांचा आत्मविश्वास अधिक असतो. अनेक संशोधनांनी पुष्टी केली आहे की, हसण्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मूड सुधारतो. फोटो किंवा सेल्फी घेताना चेहऱ्यावर हसू आणल्यास, त्या व्यक्तीला खरंच बरं वाटू शकतं. हे फोटो कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींना पाठवूनही हा आनंद वाढू शकतो.
सेल्फी हा केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित आहे, असे अनेकांना वाटते. परंतु बऱ्याच अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, सेल्फीचा वापर प्रत्यक्षात स्वत: ची काळजी घेण्याचा एक प्रकार म्हणून देखील केला जाऊ शकतो. सेल्फी काढून माणूस आपल्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच आरोग्याकडेही चांगले लक्ष देऊ लागतो. सेल्फीच्या मदतीने शस्त्रक्रियेच्या पेशंटला बरीच मदत मिळू शकते. एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, स्मार्टफोनसेल्फीचा वापर शस्त्रक्रियेनंतर होणारे इन्फेक्शन वेळीच ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो.
संबंधित बातम्या