Massage Therapy to Relax Body and Mind: प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. दररोज कामाच्या धावपळीमुळे आणि प्रेशरमुळे थकवा आणि ताण येतो. अशा वेळी हलकी मसाज केल्याने शरीराला आराम मिळेल. पण प्रत्येकाला दुसऱ्याकडून मसाज करून घेण्याची व्यवस्था असेलच असे नाही. अशा वेळी तुम्ही स्वतःच मसाज करून त्याद्वारे थकवा आणि वेदना दूर करू शकता. शरीराच्या या भागांची मालिश केल्याने तणाव आणि थकवा दूर होईल. खरं तर स्नायूंमध्ये थकवा आणि ताण जमा होतो. ज्यामुळे स्नायूंना सूज आणि कडकपणा येतो. मसाज केल्याने त्यापासून आराम मिळण्यास मदत होते.
जर तणाव आणि थकव्यामुळे डोकेदुखी होत असेल तर डोक्याला हलकेच मसाज करा. बोटांच्या साहाय्याने डोक्याला तेल लावून मालिश केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि तणाव दूर होतो. ज्यामुळे वेदना आणि तणावापासून आराम मिळतो.
जर कामामुळे टेन्शन येत असेल आणि शरीर जड वाटत असेल तर मान आणि जबड्याची मालिश करणे फायदेशीर ठरते. आपल्या गळ्याभोवतीच्या स्नायूंमध्ये ताण साठलेला असतो. दोन्ही हातांच्या साहाय्याने मानेच्या दोन्ही बाजूंना हाताने दाब लावून मसाज केल्याने आणि मान स्ट्रेच केल्याने आराम मिळतो. त्याचप्रमाणे सर्कुलर मोशनमध्ये दाब देऊन बोटांनी जबड्याची मालिश केल्याने तणावामुळे होणारी वेदना आणि थकवा कमी होतो.
सलग अनेक तास लॅपटॉपवर काम केल्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा येतो. हा थकवा कमी करण्यासाठी दोन्ही तळवे चोळून गरम करा आणि उबदार तळहात डोळ्यांवर ठेवा. तळहाताची उष्णता डोळ्यांना आराम देते.
हातांना आराम देण्यासाठी स्ट्रेस बॉलच्या मदतीने तळवे आणि बोटे रिलॅक्स करा. हाताने तुमचे दंड हलकेच दाबा आणि सोडा. काही सेकंदांच्या हँड मसाज मुळे तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल.
हील्स फूटवेअर घातल्यामुळे तुमचे पाय दुखत असतील तर पायाखाली चेंडू ठेवून तो चोळा. हलक्या हाताने दाब देऊन बोटांच्या साहाय्याने तळव्याची मालिश करा. दररोज काही सेकंद मालिश केल्याने शरीराला आराम मिळेल आणि कामाचा थकवा दूर होईल. दररोज शरीराच्या प्रत्येक भागाची काही सेकंद मालिश केल्यास तणाव दूर होण्यास आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या