
Water Saving Tips: नुकतेच करण्यात आलेल्या संशोधनामधून १९९३ ते २०१० या कालावधीत २१५० गिगाटन भूजलच्या उत्खननामुळे पृथ्वीचा अक्ष कशाप्रकारे झुकला आहे, हे स्पष्ट झाले आहे . ही बाब आपली पाणी वापरण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय याबाबत पुनर्विचार करण्याकरिता मानवांसाठी वेक-अप कॉल आहे. आपण कमी होणाऱ्या जलस्रोतांचा सामना करत असताना आपल्या गोड्या पाण्याच्या स्रोतांवरील भार कमी केला पाहिजे, हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे पाण्याच्या योग्य वापरासाठी प्रक्रियांचा अवलंब करणे आणि जलस्रोत पुन्हा भरतील यावर लक्ष केंद्रित करणे ही उद्योग व कृषीक्षेत्राची जबाबदारी आहे. तर दुसरीकडे वैयक्तिकदृष्ट्या किंवा कुटुंबांनी शाश्वत जीवनशैली निवडींचा अवलंब करणे देखील अपरिहार्य गरज आहे. गोदरेज अॅण्ड बॉईसच्या पर्यावरणीय स्थिरतेच्या प्रमुख तेजश्री जोशी यांच्याकडून याबद्दल अधिक जाणून घेऊयात...
सांडपाण्याचा पुनर्वापर करणे, पावसाचे पाणी गोळा करणे व साठवणे, जल कार्यक्षम उपकरणांचा अवलंब करणे आणि पर्यावरणाबाबत जागरूक व्यवसायांना पाठिंबा देणे यांसारख्या जाणीवपूर्वक निवडीद्वारे आपण आपल्या जलस्रोतांवरचा ताण लक्षणीयरित्या कमी करू शकतो. घरामध्ये गळणारे फिक्स्चर वेळेवर प्लग करणे, दात घासताना किंवा हात धुताना नळ चालू राहणार नाही याची खात्री घेणे, आंघोळीसाठी विशिष्ट प्रमाणात पाणी वापरणे आणि घरातील फ्लोअरिंग साफ करणे यांसारख्या इतर कारणांसाठी वॉटर प्युरिफायरमधून काढून टाकलेले अतिरिक्त पाणी वापरणे यामुळे जास्तीत-जास्त पाणी वाचवण्यास मदत होऊ शकते. गृहखरेदीदार निव्वळ शून्य पाण्याच्या इमारतींमध्ये आणखी गुंतवणूक करू शकतात, कारण अशा इमारतींमध्ये पाण्याचा अपव्यय होत नाही, ज्यामुळे अधिक खर्च करावा लागत नाही. गृहनिर्माण सोसायट्या किंवा रहिवासी संकुल पावसाच्या पाण्याची साठवण करण्याची यंत्रणा बसवून आणि अधिक प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी जमिनीत झिरपणारी हरित पायाभूत सुविधा निर्माण करून पाणी वाचवू शकतात. काही मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये स्थानिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे देखील आहेत - ट्रीटमेंट प्रक्रियेनंतर मिळणारे पाणी हरित क्षेत्राची देखरेख करण्यासाठी आणि कार व गाड्या धुण्यासाठी वापरले जाऊ शकते.
या सजग कृती सहयोगाने मोठे परिवर्तन घडवून आणू शकतात, ज्यामुळे आपल्या परिसंस्थांवरील ताण कमी होऊ शकतो आणि दीर्घकाळापर्यंत जल सुरक्षिततेची खात्री मिळू शकते. पाण्याची बचत होण्यासोबत शाश्वत राहणीमानामुळे इतर फायदे देखील होतात जसे आरोग्यामध्ये सुधारणा होते, आर्थिक बचत होते आणि जीवनाचा दर्जा सुधारतो. म्हणून अशा प्रकारच्या जीवनशैलीचा अवलंब केल्याने भविष्याकरिता पाण्याचे जतन होण्यासोबत आपण सध्या ज्या आव्हानांचा सामना करत आहोत त्यावर उपाय मिळण्यास देखील मदत होईल. व्यक्ती व समुदाय म्हणून आपण आज अवलंबलेल्या शाश्वत पद्धतींमुळे आपल्या भावी राहणीमानामध्ये आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो.
संबंधित बातम्या
