How much water to drink in a day: पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आपले आरोग्य बऱ्याच प्रमाणात सुधारू शकते. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी असे अनेक फायदे होतात प्रत्येकालाच माहिती आहे. मात्र ते फायदे नेमके काय आहेत हे अनेकांना अद्याप माहितीच नाही. महत्वाचं म्हणजे सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी नेमकं किती पाणी प्यावं, दिवसभरात किती पाणी प्यावं हेही बहुतांश लोकांना माहिती नाही. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
आयुर्वेदानुसार, पाणी नेहमीच एक-एक घोट घोट प्यायला हवं. अशाने शरीराच्या तापमानानुसार पाणी शरीरात जाते. शिवाय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाणी पिण्याचे काही नियम आहेत जे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहेत. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने त्वचा, यकृत, किडनी आणि डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात. प्रत्येक ऋतूमध्ये याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आज आपण पाणी पिण्याचे सर्व नियम जाणून घेऊया.
दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचेला ओलावा मिळतो. ज्यामुळे ती चमकते आणि त्वचेच्या आजारांपासूनही बचाव होतो. शिवाय शरीरातील विषारी घटक बाहेर पडल्याने त्वचेचे आरोग्य सुधारून पिंपल्ससारखे परिणामही मोठ्या प्रमाणात कमी होतात. तसेच उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेचा रंग सुधारतो.
पाणी शरीराला प्रचंड उपयुक्त आहे. पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकते. ज्यामुळे शरीराची सर्व प्रक्रिया सुधारते. शिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
जर तुम्हाला थकवा किंवा निरुत्साही वाटत असेल तर पाणी प्या. हे रक्तातील लाल रक्तपेशींमुळे अधिक ऑक्सिजन आणि ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळून उत्साही वाटू लागते.
-आयुर्वेदानुसार उभे राहून कधीही पाणी पिऊ नये. उभे राहून पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, पाणी नेहमी बसून प्यावे. बसून पाणी प्यायल्याने ते शरीरात चांगले शोषले जाते.
- पाणी नेहमी कोमट किंवा खोलीच्या तपमानानुसार प्यावे. रेफ्रिजरेटरमधून थेट घेतलेले पाणी कधीही पिऊ नये. आयुर्वेदानुसार रेफ्रिजरेटरचे पाणी प्यायल्याने पचनास त्रास होऊ शकतो.
-सकाळी उठल्याबरोबर १ ग्लास रिकाम्या पोटी पाणी प्यावे.
-दुपारच्या जेवणाच्या १ तास आधी किंवा १ तास नंतर.
-काहीही खाण्यापूर्वी एक ते दीड तास आधी पाणी प्यावे.
-शिवाय रात्री जेवल्यानंतर १ तासाने पाणी प्यावे.
- दिवसाभरात ८ ग्लास पाणी हे शरीरात जायलाच हवे. शिवाय हळूहळू प्रमाण वाढवत दिवसात सुमारे २ ते ३ लिटर पाणी प्यायला हवे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)