Rishi Panchami Bhaji Recipe: हिंदू कॅलेंडरनुसार, नुकतंच श्रावण महिना संपून भाद्रपद महिना प्रारंभ झाला आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ऋषी पंचमीचा उपवास केला जातो. श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी हा ऋषी पंचमीचा सण साजरा केला जातो. यंदा ऋषीपंचमीचा सण आज अर्थातच ८ सप्टेंबरला आला आहे. मान्यतेनुसार, हा दिवस विशेषतः भारतातील ऋषींचा सन्मान करण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे.
ऋषीपंचमीच्या दिवशी ब्राह्मणांना दान देण्याची विशेष प्रथा आहे. असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीच्या दिवशी उपवास केल्याने जाणून-बुजून झालेल्या चुकांची क्षमा मिळते. ऋषी पंचमीला ऋषीची भाजी म्हणून एक पारंपरिक मिक्स भाजी बनवली जाते. अशी मान्यता आहे की, आजच्या दिवशी शेतात नांगर किंवा बैलांच्या पायाचा स्पर्श झालेल्या भाज्या खायच्या नाहीत. आणि त्यामुळेच काही विशिष्ट भाज्या घेऊन त्या एकत्र करून त्यांची भाजी बनवली जाते. चला तर मग पाहूया ही पारंपरिक मिक्स भाजी बनवायची कशी.
-लाल भोपळा १५० ग्रॅमचे तुकडे करून
-दोडका १ मध्यम
-काकडीच्या बिया काढा आणि २ मध्यम तुकडे करा
-कॉर्न कर्नल १/२ कप
-भेंडी १०-१२, चिरलेली
-५-६ हिरव्या मिरच्या कापून घ्या
-१/२ कप चिरलेली ताजी कोथिंबीर
-चवीनुसार मीठ
-३/४ कप ओलं खोबरं
-चिंचेचा कोळ
पारंपारिक मिक्स भाजी तयार करण्यासाठी, सर्वप्रथम घेतलेल्या भाज्या स्वच्छ धुवून घ्या. नंतर एक कढई गरम करा. आणि सर्व तयार भाज्या त्यात घाला, यामध्ये शिजवलेले कॉर्न, दोडका, भोपळा, काकडी, भेंडी, चिरलेली हिरवी मिरची, मीठ, चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले ओले खोबरे घाला. तसेच चिंचेचा कोळ आणि भाज्या शिजवण्यासाठी पुरेसे पाणी घाला. आता सर्व भाज्या मिक्स करा. गॅस कमी करा, झाकून ठेवा आणि मंद आचेवर आठ ते दहा मिनिटे किंवा भाजी चांगली मऊ होईपर्यंत शिजू द्या. आता तुमची मिक्स भाजी तयार आहे.