उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या लग्नात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे पती-पत्नी सहभागी झाले होते. रणबीर कपूरने या लग्ना निमित्ताने काळ्या रंगाचा भरतकाम केलेला शेरवानी परिधान केला होता. मात्र त्याच्या कपड्यांऐवजी सर्वाधिक चर्चा होतेय त्याच्या मनगटावर असलेल्या घड्याळ्याची. रणबीरने अंबानीच्या लग्नात पॅटेक फिलिप कंपनीचे प्रचंड महागडे घड्याळ घातले होते. या घड्याळाची किंमत आणि इतर वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊ या.
अभिनेता रणबीर कपूर याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसमारंभाला अतिशय महागडे पॅटेक फिलिप (Patek Philippe) घड्याळ परिधान केले होते. 'सेलिब्रिटी वॉच स्पॉटर' या इन्स्टाग्राम पेजवर रणबीरने घातलेल्या महागड्या घड्याळाची माहिती देण्यात आली आहे. हे घड्याळ हाताने बनवण्यात आले असून ५२७१ पी या कलेक्शनमधले विशेष लक्झरी घड्याळ आहे. ५२७१ पी ही पॅटेक फिलिपची आयकॉनिक मानली जाणारी ग्रँड कॉम्प्लेक्स लाइन आहे. या घड्याळात काळ्या रंगाचा डायल, चमकदार काळ्या रंगाचा अॅलिगेटर पट्टा आणि कॅलेंडर यंत्रणा आहे. अंदाजे सहा कोटी रुपये किमतीच्या या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे घड्याळात महागडे पाचू मढलेले आहेत.
अनंत अंबानी स्वतः महागड्या घड्याळांचा संग्राहक आहे. फिलिप आणि रिचर्ड मिले कंपनीच्या दुर्मिळ आलिशान वस्तूंचा संग्रह त्याच्याकडे आहे. अनंत अंबानीने राधिका मर्चंटशी लग्न करण्यापूर्वी एका पूजा समारंभात लाल कार्बन रिचर्ड मिल घड्याळ (आरएम १२-०१ टूरबिलन) हातात घातले होते. त्या घड्याळाची किंमत ६.९१ कोटी एवढी होती.
अनंत अंबानीने शाहरुख खान, रणवीर सिंग, वीर पहारिया आणि मीजान जाफरी या मित्रांना ऑडेमार्स पिगुएट (Audemars Pigue) स्वीस कंपनीची महागडी घड्याळे भेट म्हणून दिली होती. 'ल्युमिनरी एडिशन' (Luminary Edition) म्हणून ओळखले जाणारे हे घड्याळ १८ कॅरट सोन्याने मढले होते. यात ब्लॅक सब-डायल्ससह गुलाब गोल्ड डायल देण्यात आला आहे. या लक्झरी घड्याळांची बाजारातील किंमत दोन कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.