येत्या ४ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत कँसरबद्दल जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल डी’क्रूझ यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले. भारतात कँसर झपाट्याने वाढत असून प्रतिबंध आणि वेळेत निदान हीच या जीवघेण्या आजाराविरुद्धची सर्वात प्रभावी शस्त्रे असल्याचे डॉ. अनिल डी’क्रूझ यांनी सांगितले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन झाले. लोकांनी आरोग्यासंबंधी जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यशैलीत सांगितले. आपण मद्यपान करत नसल्याने अनेक आजारांपासून दूर राहिल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.
कँसरतज्ज्ञ डॉ. अनिल डी’क्रूझ म्हणाले, 'भारतात प्रत्येक पाच पुरुषांपैकी एक आणि प्रत्येक आठ महिलांपैकी एका जणाला कर्करोगाचा धोका आहे. बदलती जीवनशैली, पर्यावरणीय ऱ्हास आणि जागरूकतेचा अभाव यामुळे हा धोका वाढत आहे. कँसरमुळे लाखो लोकांचे प्राण गेले असले, तरी हा आजार बर्याच प्रमाणात टाळता येऊ शकतो. सिगारेट आणि मद्य सेवन टाळणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे या सवयी अंगीकारल्यास कँसर हा रोग टाळता येऊ शकतो असं मत डॉ. अनिल डी’क्रूझ यांनी व्यक्त केले.
मुंबईतील अंबागोपाल फाउंडेशनतर्फे नुकताच हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी आणि २००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. समाजसेवक डॉ. हरीश शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ‘जागेगा भारत तो बचेगा भारत’ अभियानाच्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
'भारतातील कर्करोगाच्या जवळपास ४०% प्रकरणे तंबाखू सेवनामुळे होतात. त्यामुळे तंबाखूच्या सेवनावर कठोर निर्बंध घालण्याची गरज आहे. लोकांनी धूम्रपान आणि तंबाखू चघळणे त्वरित बंद करण्याचे आवाहन डॉ. डी’क्रूझ यांनी केले. तसेच, मद्य सेवनाबाबतच्या चुकीच्या समजुती दूर करत, अगदी थोडेसे मद्यपानही सुरक्षित नाही, असे त्यांनी अधोरेखित केले.
पद्मश्री पुरस्कार विजेते आणि शून्य-बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते डॉ. सुभाष पाळेकर यांनी आहार आणि कर्करोग यातील संबंध उलगडून सांगितला. रासायनिक पदार्थांवर अवलंबून राहण्यामुळे आणि पाश्चात्य आहाराच्या वाढत्या प्रभावामुळे आंबट पदार्थांचे प्रमाण वाढले आहे, जे कर्करोग आणि इतर जुनाट आजारांना खतपाणी घालतात. म्हणूनच, त्यांनी बाजरी, डाळी आणि ताज्या भाज्यांवर आधारित पारंपरिक भारतीय आहाराकडे परत जाण्याचा सल्ला दिला.
संबंधित बातम्या