Khajur Barfi Recipe: रमजानचा महिना सुरू झाला आहे. इस्लाम धर्माचे पालन करणारे लोक या आशीर्वादित महिन्यात अल्लाहची उपासना करतात. या महिन्यात रोजा पाळला जातो, ज्यामध्ये दिवसभर उपाशी राहावे लागते. दिवसभर उपवास केल्यानंतर इफ्तारची वेळ येते, जेव्हा लोक विविध प्रकारचे पदार्थ खातात. उपवास सोडण्यासाठी खजूर खाल्ले जातात. अशा परिस्थितीत तुम्ही इफ्तारसाठी आधीच खजूरची बर्फी बनवून ठेवू शकता. ही बर्फी तुम्ही काही दिवस साठवून ठेवू शकता. चला तर मग जाणून घ्या खजूरच्या बर्फीची रेसिपी.
- २ कप खजूर
- २ कप दूध,
- २ चमचे बदाम
- २ चमचे अक्रोड
- २ चमचे पिस्ता
- २ चमचे मनुके
- २ चमचे किसलेले दाणे
- २ चमचे चारोळी
- ४ चमचे तूप
- मध्मय आकाराचा गुळाचा तुकडा
खजूर बर्फी बनवण्यासाठी प्रथम खजुराच्या बिया काढून त्यांचे लहान तुकडे करा.नंतर आदल्या रात्री दुधात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी ते चांगले बारीक करून त्याची पेस्ट तयार करा.आता गुळाचा पाक बनवा. यासाठी गुळात थोडे पाणी मिसळा आणि नंतर मंद आचेवर शिजवा. थोडा वेळ शिजल्यानंतर पाक घट्ट झाल्यावर गॅसवरून खाली उतरवा. आता कढईत तूप गरम करून त्यात खजुराची पेस्ट घालून भाजून घ्या. नंतर सर्व ड्रायफ्रुट्स बारीक चिरून घ्या. खजुराची पेस्ट भाजून जेव्हा ते तूप सोडू लागेल तेव्हा त्यात सर्व बारीक कापलेले ड्राय फ्रूट्स घाला आणि चांगले मिक्स करा. आता त्यात गुळाचा पाक घाला आणि थोडा वेळ शिजू द्या. नंतर प्लेटला थोडं तूप लावून हे मिश्रण प्लेटमध्ये काढा. थंड होऊ द्या आणि बर्फीचे तुकडे करा. तुमची खजूराची बर्फी तयार आहे.