Psychology Tips: मानसशास्त्राच्या मते, खोटं बोलणं हीसुद्धा एक कला आहे. ही गोष्ट प्रत्येकालाच जमत नाही. काही लोक खोटे बोलण्यात इतके सराईत असतात की, ते खोटे तर बोलतात पण समोरच्या व्यक्तीला त्यांच्यावर अजिबात संशय येत नाही. आपले काम करून घेण्यासाठी इतरांना वेठीस धरणे आणि त्यांना आपल्या खोटारडेपणात अडकविणे हा त्यांचा स्वभाव आहे. अनेकदा समोरच्याचा खोटारडेपणा पकडता न आल्याने आपल्याला नुकसानालाही सामोरे जावे लागते. पण खोटं बोलण्यात पारंगत असलेल्या लोकांचा खोटारडेपणा पकडणं खरंच अशक्य आहे का? नाही, तसं मुळीच नाही. खोटं बोलण्यात कुणी कितीही निष्णात असलं तरी मानसशास्त्रानुसार त्याचे हावभाव, वर्तन पाहून क्षणार्धात त्याचा खोटेपणा हेरता येतो. आजकाल रिलेशनशिपमध्ये अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. बऱ्याचवेळा जोडीदार एकमेकांना खोटे बोलून त्यांची फसगत करत असतात. त्यामुळे अनेक तरुण-तरूणी डिप्रेशनसारख्या गोष्टींना बळी पडत आहेत. तर तुम्हालाही तुमच्या जोडीदाराचा खोटारडेपणा पकडायचा असेल, तर या टिप्स खास तुमच्यासाठी...
एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल, तर त्याची बोलण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. सर्वसाधारणपणे खोटं बोलताना त्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत, त्याच्या संभाषणाची शैली पूर्णपणे वेगळी होते. काही लोक खोटे बोलताना बोलण्याच्या त्यांच्या सामान्य वेगापेक्षा वेगाने बोलू लागतात. तर त्याचवेळी काही जण अतिशय विचारपूर्वक बोलू लागतात. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलते, तेव्हा त्याच्या बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. जर त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीत बदल झाला तर समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे हे लगेच समजून घ्या.
एखादी व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं, हे जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे लक्ष द्या. खोटं बोलणारी व्यक्ती कधीच डोळ्यात डोळे घालून बोलत नाही. एकतर त्यांचे डोळे पाणावतील किंवा ती व्यक्ती डोळ्यात न बघता आजूबाजूला बघेल. त्यामुळे जर एखादी व्यक्ती डोळ्यांचा संपर्क साधत नसेल आणि डोळे फिरवत असेल तर ती व्यक्ती खोटं बोलत असल्याची शक्यता असते.
खोटं बोलताना ती व्यक्ती खूप अस्वस्थ होते. कुणी खोटं बोलण्यात सराईत असलं तरी त्याला पकडलं जाण्याची भीती असते. त्यामुळेच या अस्वस्थतेत खोटं बोलताना त्याचे बोलणे आणि कृती जुळत नाहीत. जेव्हा जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याशी बोलत असेल तेव्हा त्याच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे लक्ष द्या. जर दोघांमध्ये फरक दिसत असेल तर समोरची व्यक्ती खोटं बोलण्याची शक्यता असते.
जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलत असते, तेव्हा त्याला पकडलं जाण्याची भीतीही असते. अशा वेळी त्याच्यात आपोआप आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. त्याच्या देहबोलीतून आत्मविश्वासाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. खोटं बोलताना ती व्यक्ती अस्वस्थतेने हात चोळू लागते, नखे चावू लागते, पाय हलवू लागते. त्याचबरोबर आपले हावभाव लपवण्यासाठी ती व्यक्ती वारंवार तोंड किंवा डोळे झाकू लागते.
एखादी व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं हे शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना प्रश्न विचारणे. खोटं बोलणारी व्यक्ती आपल्याला गोष्टी सांगायला तर तयार असते, पण त्या विषयाबद्दल काही प्रश्न विचारले की, घाबरतात आणि उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा लगेच त्यासंबंधित काही प्रश्न विचारा. समोरच्या व्यक्तीच्या वागण्याने तो खोटं बोलतोय की खरं बोलतोय हे लगेच लक्षात येईल.