Pressure Cooker Tips: प्रेशर कुकरचा वापर आज जवळपास प्रत्येक घरात केला जातो. याचा वापर करणे अतिशय सोपे आहे. तसेच, यामुळे गॅस आणि वेळ या दोन्हींची बचत होते. पण, त्याच्या फायद्यांची यादी वगळता, त्याच्या तोट्यांची यादीही बरीच मोठी आहे. कुकरच्या वापरात थोडासा हलगर्जीपणा केल्यास मोठी दुर्घटनाही होऊ शकते. गॅसवर लावलेल्या कुकरचा अचानक स्फोट झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. कुकरचा स्फोट इतका भयंकर असतो की, अनेकदा आजूबाजूच्या लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही भविष्यातील कोणत्याही संभाव्य दुर्घटना टाळू शकता.
कुकरमध्ये अन्न शिजवताना घाईगडबडीत लगेच कुकर उघडण्याचा प्रयत्न करू नका. गॅस बंद केल्यानंतर कुकरच्या आत काही काळ वाफ भरली जाते, हे तुम्हाला माहित असेलच. या दरम्यान त्याच्या आत खूप दाब असतो. अशावेळी जबरदस्तीने कुकर उघडू नका. सर्वप्रथम शिट्टी उचलून त्यातील सर्व वाफ बाहेर पडू द्या, नंतर झाकण उघडा.
कुकरमध्ये अन्न शिजवताना गरजेपेक्षा जास्त वेळ गॅसवर ठेवू नये, याची काळजी घ्यावी. अनेकवेळा अन्न जास्त गरम झाल्यामुळे कुकरचा स्फोट होऊ शकतो. खरं तर ते जास्त वेळ गॅसवर ठेवल्याने त्याच्या आतील दाब वाढतो, ज्यामुळे तो फुटण्याची शक्यता वाढते.
अनेकदा स्वयंपाक करताना आपण कुकरमध्ये जास्त सामान भरतो. असे करणे खूप धोकादायक ठरू शकते. कुकरमध्ये अन्न शिजवताना त्यातील फक्त तीन चतुर्थांश भाग भरला जाईल, हे लक्षात ठेवावे. यापेक्षा जास्त कुकर भरल्यास त्याचा व्हेंट बंद होऊ शकतो. यानंतर वाफेचे उत्सर्जन थांबते आणि कुकर फुटण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
कुकरमध्ये स्वयंपाक करताना कमी पाणी वापरले तर ते खूप धोकादायकही ठरू शकते. नेहमी योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करावा. खूप कमी पाणी घातल्यास कुकरच्या आतील दाब खूप वाढू शकतो, ज्यामुळे स्फोट देखील होऊ शकतो. यासोबतच कुकरमध्ये स्वयंपाक करताना जास्त तेल वापरत असाल, तर तुम्हीही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
कुकर वापरताना काही छोट्या, पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्या. कुकरच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. नेहमी चांगल्या ब्रँडचा कुकर खरेदी करा. खूप जुने आणि तुटलेले कुकर वापरणे टाळा. शिट्टी शिवाय कुकरमध्ये कधीही अन्न शिजवू नका. तसेच त्याचे रबर आणि सेफ्टी व्हॉल्व्ह तपासा. झाकण घट्ट बंद करायला नेहमी विसरू नका.
संबंधित बातम्या