First sign of pregnancy: आईपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा टप्पा असतो. प्रत्येक स्त्री आयुष्याच्या या टप्प्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही वेळ नक्कीच येते. ज्यामध्ये गरोदर राहणे हा तिच्यासाठी खूप आनंदाचा काळ असतो. एक स्त्री तिच्या गरोदर जीवनाबद्दल इतकी उत्साहित असते की, तिला या काळात झालेल्या वेदना, त्रास आणि अस्वस्थता देखील ती विसरून जाते. गर्भधारणेदरम्यान एखाद्या स्त्रीला नेमके कसे वाटते? हा प्रत्येक स्त्रीच्या मनात घोंघावणारा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते, बहुतांश महिलांच्या मनात एक प्रश्न असतो की, गर्भधारणा झाल्यानंतर त्यांना कितव्या दिवशी उलट्या व्हायला लागतात. तर काही महिलांच्या मनात हा प्रश्न असतो की, असे कोणते लक्षण किंवा चिन्ह असेल ज्याद्वारे त्यांना गर्भधारणेबद्दल कळू शकेल. आज आम्ही तुम्हाला स्त्रियांच्या मनात असलेल्या अशाच काही प्रश्नांबद्दल महत्त्वाची माहिती देणार आहोत.
ज्या महिला फॅमिली प्लॅनिंग करत आहेत. त्यांनी सर्वप्रथम हे जाणून घेणे आवश्यक आहे की, गर्भधारणेदरम्यान उलट्या का होतात. वास्तविक, गर्भधारणेदरम्यान उलट्या किंवा मळमळ होण्याच्या समस्येला मॉर्निंग सिकनेस म्हणतात. आता ही लक्षणे का उद्भवू लागतात? याचे कारण म्हणजे गर्भधारणेदरम्यान हार्मोन्समध्ये बदल होतो आणि त्यामुळे मळमळ आणि कधीकधी उलट्या येण्यासारखी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय, कधीकधी गर्भधारणेदरम्यान रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळेदेखील अशी लक्षणे दिसू लागतात.
महत्वाचं म्हणजे ही लक्षणे एखाद्या स्त्रीच्या गर्भधारणेच्या चौथ्या आठवड्यानंतर अर्थातच एक महिन्यानंतर दिसतात. ही लक्षणे जवळपास १२ ते १४ आठवडे राहतात. काही स्त्रियांमध्ये, मॉर्निंग सिकनेसची लक्षणे दुसऱ्या महिन्यातसुद्धा तशीच राहतात. तर काही स्त्रियांमध्ये, संपूर्ण गर्भधारणेदरम्यान ही लक्षणे कायम राहतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान मॉर्निंग सिकनेसची ही लक्षणे सामान्यतः संपूर्ण गर्भधारणेदरम्यान अर्थातच नऊ महिने टिकतात. त्यामुळेच गरोदर महिलांना उलटी येणे, मळमळणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
सर्वसामान्यपणे बहुतांश लोकांना असे वाटते की, गर्भधारणेचे पहिले लक्षण म्हणजे उलट्या किंवा मळमळ होणे हे आहे. पण सर्वांच्या बाबतीत हेच घडेलच असे नाही. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये, मासिक पाळी चूकल्यानंतर मॉर्निंग सिकनेस हे गर्भधारणेचे पहिले लक्षण असते. शिवाय अनेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी येण्यापूर्वीच मॉर्निंग सिकनेसची लक्षणे दिसू शकतात. अशावेळी त्या महिला गरोदर असण्याची पूर्ण शक्यता असते.
गर्भधारणेनंतर तुम्हाला तुमच्या स्तनांमध्ये महत्वाचे आणि मोठे बदल जाणवू शकतात. याकाळात स्तनांमध्ये जडपणा, सूज आणि वेदना जाणवणे ही गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. याव्यतिरिक्त, स्तनाग्रांचा रंग गडद होऊ शकतो आणि निपल्सभोवतीची त्वचा बदलू शकते. अशी लक्षणे दिल्यास ती महिला गरोदर असल्याचे लक्षात येते.