गर्भवती महिलांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते. गर्भधारणेदरम्यान विविध पदार्थांची भूकदेखील प्रचंड वाढते. कधी आईस्क्रीम खाण्याचा मोह मनाला होतो, तर कधी चटपटीत खायचं मन होतं. तर काही महिलांची भूक गर्भधारणेदरम्यान पूर्णपणे कमी होते. परंतु बहुतेक गर्भवती महिलांमध्ये एक गोष्ट सामान्य असते ती म्हणजे आंबट अन्नाची लालसा होय. गरोदरपणात, बहुतेक स्त्रिया लिंबू, संत्री, गोड लिंबू, कच्चा आंबा किंवा चिंच यांसारख्या आंबट पदार्थांची लालसा करू लागतात. असे का होते माहीत आहे का? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, मासिक पाळी आणि प्रसूतीपूर्व म्हणजेच बाळंतपणापूर्वी स्त्रियांमध्ये अन्नाची लालसा वाढू लागते. शरीरात पौष्टिकतेची कमतरता, हार्मोनल बदल आणि मळमळ आणि उलट्या हे अन्नाच्या लालसेचे कारण असू शकतात.सायन्स डायरेक्टच्या अहवालानुसार,आंबट खाण्याचे इच्छा होण्याचे कारण म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात फायबर असणे. आंबट आणि मसालेदार अन्नाची लालसा होण्याचे कारण म्हणजे फॅटी ऍसिडची उच्च पातळी असणे. पहिल्या त्रैमासिकात शरीरात फायबरचे प्रमाण वाढल्याने महिलांना आंबट अन्न जास्त खावेसे वाटते.
गर्भधारणेदरम्यान, शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढू लागते. ज्याचा परिणाम चव आणि वासावर दिसून येतो. त्यामुळे आंबट-मसालेदार पदार्थांचे आकर्षण वाढत असतानाच काही पदार्थांबद्दल नापसंतीही निर्माण होऊ लागते. या हार्मोन्समुळे तोंडात चव आणि वासाची संवेदनशीलता वाढते. त्यामुळेच महिलांना आंबट खायची इच्छा होते.
गरोदरपणात महिलांच्या शरीरात कॅल्शियम आणि लोहाची कमतरता वाढते. आईस्क्रीमची लालसा गरोदर महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता दर्शवते. तर गरोदर महिलांमध्ये व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे त्यांना आंबट आणि मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह होतो. तळलेले स्नॅक्स खाल्ल्याने वजन वाढण्यासोबतच शरीराला ॲसिडिटीचा सामना करावा लागतो. शरीरातील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी टरबूज, लिंबू, संत्री आणि द्राक्षे यांचे सेवन करा. आंबट खाण्याची लालसा दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात वाढते.
हवाई पॅसिफिक हेल्थच्या अहवालानुसार, पहिल्या तिमाहीत महिलांना लोणचे आणि बटाटा चिप्स किंवा फ्रेंच फ्राईसारखे खारट स्नॅक्स खायला आवडतात. यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढण्यास मदत होते. खरं तर, प्रोजेस्टेरॉनच्या पातळीमुळे लघवीद्वारे सोडियम कमी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. सोडियमच्या कमतरतेमूळेच महिलांना आंबट, खारट खाण्याची इच्छा होते.
(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)