Polygraph Test: डॉक्टरांकडे असते खोटेपणा पकडण्याची मशीन, 'पॉलिग्राफी चाचणी' म्हणजे नेमकं काय? कशी होते? जाणून घ्या-polygraph test what is polygraph test in kolkata case and how is it done ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Polygraph Test: डॉक्टरांकडे असते खोटेपणा पकडण्याची मशीन, 'पॉलिग्राफी चाचणी' म्हणजे नेमकं काय? कशी होते? जाणून घ्या

Polygraph Test: डॉक्टरांकडे असते खोटेपणा पकडण्याची मशीन, 'पॉलिग्राफी चाचणी' म्हणजे नेमकं काय? कशी होते? जाणून घ्या

Aug 20, 2024 05:12 PM IST

What is a polygraph test: सर्वसामान्य लोकांना पॉलीग्राफ चाचणीबाबत फारसं माहिती नाही. त्यामुळेच आज आम्ही या चाचणीबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत.

कोलकाता केसमधील पॉलिग्राफी टेस्ट म्हणजे काय
कोलकाता केसमधील पॉलिग्राफी टेस्ट म्हणजे काय

Polygraph test to be held in Kolkata case: कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या अमानवीय कृतीने देश हादरला आहे. देशभरात या घटनेचे पडसाद उमठले आहेत. लवकरात लवकर पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळेच सीबीआय यंत्रणेला हे प्रकरण लवकरात लवकर सोडवायचे आहे. यासाठी तपास यंत्रणा आरोपी संजय रॉयचे मन वाचण्याचा प्रयत्न करत आहे. सीबीआयने यापूर्वी मनोवैज्ञानिक चाचणीचा अवलंब केला होता. ज्याद्वारे संजय रॉय यांची प्रकृती आणि मानसिक स्थिती जाणून घेतली जात होती. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात सीबीआयला आरोपीच्या पॉलीग्राफ चाचणीची परवानगी मिळाली असून, लवकरच ही चाचणी होऊ शकते. सर्वसामान्य लोकांना या चाचणीबाबत फारसं माहिती नाही. त्यामुळेच आज आम्ही या चाचणीबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत.

पॉलीग्राफ चाचणी म्हणजे काय?

पॉलीग्राफ चाचणीला 'लाय डिटेक्टर टेस्ट' असेही म्हणतात. शिवाय पॉलीग्राफ चाचणीला खोटे पकडण्याची मशीन असेही म्हटले जाते. एखादी व्यक्ती खोटे बोलत आहे की, नाही हे शोधण्यासाठी याचा वापर केला जातो. या चाचणीमध्ये जेव्हा एखाद्याला प्रश्न विचारला जातो तेव्हा मशीन त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाची गतीदेखील मोजते. 

तज्ज्ञांच्या मते, लाय डिटेक्टर मशीनच्या परिणामांवर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. काहीवेळा ते चुकीचे होते आणि मानवी भावना देखील या मशीनचे परिणाम बदलू शकतात. याशिवाय अनेक सराईत गुन्हेगार शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून खोटे बोलू शकतात, जे सहजासहजी पकडता येत नाहीत. त्यामुळे न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाही. तरीसुद्धा केसमध्ये काहीसा धागा मिळेल या अर्थाने डॉक्टरांकडून ही टेस्ट केली जाते.

 

पॉलिग्राफ चाचणी कशी केली जाते?

मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये केली जाणारी पॉलिग्राफ टेस्ट कशी याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं असतं. तर पॉलीग्राफ मशीन म्हणजेच लाय डिटेक्टर मशीनमध्ये वेगवेगळी उपकरणे असतात. ही उपकरणे आरोपीच्या हाताला आणि छातीला जोडलेली असतात. जेव्हा आरोपीला प्रश्न विचारला जातो तेव्हा ही उपकरणे त्याच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि श्वासोच्छवासाची गती मोजतात. या सर्व गोष्टी एकाच मशीनवर दिसतात. जसे की त्याच्या हृदयाचे ठोके किती वेगवान आहेत किंवा तो किती वेगाने श्वास घेत आहे. कारण सर्वसामान्यपणे जेव्हा कुणी खोटे बोलतो तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाची गती पूर्णपणे बदलते. या बदलामुळे तो खोटे बोलत आहे की, खरे बोलत आहे हे कळते. अशाप्रकारे हे मशीन काम करते.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

विभाग