Pumpkin Sabji Recipe: सनातन धर्मात पितृ पक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला श्राद्ध पक्ष सुरू होतो. यावर्षी पितृ पक्ष मंगळवार १७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २ ऑक्टोबरला संपेल. पितृ पक्षात पितरांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान अशी कर्मे केली जातात. असे मानले जाते की पितरांना वंदन केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो. श्राद्ध पक्षात पितरांसाठी काही गोष्टी बनविण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. यात भोपळ्याच्या भाजीचा समावेश होतो. या भाजीची रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया श्राद्धामध्ये भोपळ्याची भाजी कशी बनवावी.
- १/२ किलो भोपळा
- १/२ टीस्पून मेथी दाणे
- १/२ टीस्पून लाल तिखट
- १ टीस्पून धणे पावडर
- १/४ टीस्पून हळद
- १/४ टीस्पून मोहरी
- १/४ टीस्पून जिरे
- २-३ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
- १/४ टीस्पून साखर
- २ टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली
- ३ टेबलस्पून तेल
- मीठ चवीनुसार
भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी नेहमी पिकलेला लाल भोपळा वापरा. भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम भोपळा कापून त्यावरील जाड साल चाकूने काढून टाका. यानंतर भोपळ्याचे छोटे तुकडे करून बाजूला ठेवा. तसेच हिरवी मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घ्या. आता एका कढईत तेल घालून मध्यम आचेवर गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे आणि मेथीचे दाणे घालून काही सेकंद तडतडू द्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हळद घालून भोपळ्याचे तुकडे घालावे. आता चमच्याच्या साहाय्याने भोपळा मसाल्यांमध्ये नीट मिक्स करा. आता कढई झाकून भोपळा मध्यम आचेवर ५ मिनिटे शिजू द्या.
भोपळा शिजल्यावर त्यात लाल तिखट, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व काही चांगले मिक्स करावे. यानंतर पुन्हा भाजी झाकून भोपळा शिजेपर्यंत शिजवावा. शेवटी भोपळ्यात साखर आणि कोथिंबीर घालून नीट मिक्स करून गॅस बंद करा. तुमची टेस्टी भोपळ्याची भाजी तयार आहे.