Problems during Period: मुली आणि स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्यामध्ये पोटदुखी, डोकेदुखी, मूड बदलणे आणि थकवा यांचा समावेश होतो. या समस्या दिसायला अतिशय सामान्य आहेत. परंतु काहीवेळा ते PCOD च्या गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षणदेखील असू शकतात. अनेक वेळा मुली-स्त्रिया सुरुवातीच्या काळात या आजाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या आजाराचे गंभीर परिणाम दिसू लागतात. मासिक पाळीदरम्यान ही लक्षणे दिसल्यानंतर घरगुती उपाय आणि दैनंदिन जीवनात अनेक खबरदारी घेऊन तुम्ही या आजारापासून दूर राहू शकता. यासोबतच होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने सोप्या उपचाराने तुम्ही या आजारापासून मुक्ती मिळवू शकता. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
PCOD म्हणजेच 'पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसीज' ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या बनली आहे. या आजारात हार्मोन्समुळे अंडाशयात लहान गाठ किंवा गुठळ्या तयार होतात. या सिस्ट्समुळे महिलांमध्ये हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणात होऊ लागतात. कारण या गाठी मासिक पाळी आणि गर्भधारणेला त्रास देतात. अलीकडच्या काळात महिलांमध्ये पीसीओडीची समस्या झपाट्याने वाढत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड रिसर्चच्या मते, आपल्या देशातील सुमारे १० टक्के महिलांना PCOD च्या समस्येने ग्रासले आहे. या समस्येमुळे शरीरात हार्मोनल बिघाड होतात. त्यामुळे चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर दाट केस येऊ लागतात. ही या समस्येची सामान्य लक्षणे आहेत.
सांगायचं झालं तर, या आजाराचे मुख्य कारण अद्याप समजलेले नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते आयुष्यात झपाट्याने वाढणारा ताणतणाव, बदललेली जीवनशैली, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि नंतर दिवसा उशिरापर्यंत झोपणे, धूम्रपान आणि मद्यपानात महिलांची वाढती आवड इत्यादी पीसीओडीची प्रमुख कारणे असू शकतात. कारण यामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते. शिवाय ही समस्या आनुवंशिक देखील आहे. सध्या अनेक महिला या आजाराला तोंड देत आहेत.
पीसीओडीचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे मासिक पाळी वेदनासह नियमित किंवा दीर्घकाळ राहणे किंवा न येणे. जसे, एका वर्षात ९ पेक्षा कमी कालावधी, दोन पाळींमध्ये ३५ दिवसांपेक्षा जास्त अंतर असणे. मासिक पाळीमध्ये नेहमीपेक्षा प्रचंड वेदना होणे. चेहऱ्यावर, मानेवर पुरुषांसारखे दाट केस येणे. अशा समस्या दिसू लागतात. मासिक पाळीदरम्यान तुम्हाला या समस्या दिसू लागल्यास याकडे दुर्लक्ष करू नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)