what care to take during your period: मासिक पाळीबाबत आपल्या घरात आणि समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. जसे की लोणच्याला हात न लावणे, वेदनाशामक औषध न घेणे आणि धार्मिक कार्यांपासून दूर राहणे. या गैरसमजांचा स्त्रियांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बऱ्याचवेळा, मुलींना त्यांच्या मासिक पाळीत अपमान किंवा लाजिरवाणा अनुभव येतो. ज्यामुळे त्यांना त्यांच्या शरीराबद्दल उघडपणे बोलणे टाळवे लागते. यापैकी एक गैरसमज म्हणजे मासिक पाळी दरम्यान केस धुणे होय. हे गैरसमज शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून पुसून टाकण्याची गरज आहे. जेणेकरुन महिलांना समजू शकेल आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल.
अलीकडे सोशल मीडियावर सतत विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये आरोग्यविषयक व्हिडीओसुद्धा असतात. या व्हिडिओमध्ये आरोग्याबाबत विविध तर्क वितर्क सांगितले जातात. यामध्ये काही सत्य असतात तर काही असत्य असतात. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रीलमध्ये असे म्हटले होते की, मासिक पाळी दरम्यान केस धुतल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. हा युक्तिवाद निराधार तर आहेच पण मूर्खपणाचाही आहे. असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. चला जाणून घेऊया तज्ज्ञ काय सांगतात.
पिरियड्स या नावानेही ओळखली जाणारी मासिक पाळी दर महिन्याला येते. जेव्हा गर्भाशयाचे आतील अस्तर जाड होते आणि नंतर तुटून बाहेर पडते. याला मासिक पाळी असेही म्हणतात. पीरियड रक्त, जे अंशतः रक्त आणि अंशतः गर्भाशयाचे ऊतक असते, तुमच्या योनीमार्गे तुमच्या शरीरातून बाहेर येते. ही प्रक्रिया हार्मोन्सद्वारे चालविली जाते.
केस धुणे आणि मासिक पाळीत रक्तस्त्राव यांचा थेट वैज्ञानिक संबंध नाही. तथापि, काही महिलांना मासिक पाळी दरम्यान केस धुण्यास अस्वस्थता वाटू शकते. यावेळी, शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. ज्यामुळे तुमची स्थिती बिघडू शकते. ही प्रक्रिया शारीरिकदृष्ट्या थकवणारी असू शकते. ज्यामुळे अशक्तपणाची भावना येऊ शकते. मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोनल बदल आणि शारीरिक अस्वस्थता यामुळे, काही स्त्रियांना हलके आणि आरामदायक वाटण्यासाठी केस धुण्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु सामान्यतः, जर एखाद्याला कोणतीही समस्या नसेल तर ते कोणत्याही काळजीशिवाय आपले केस धुवू शकतात.
याबाबत तज्ज्ञ म्हणतात, “महिलांना हे माहित असणे आणि समजून घेणे आवश्यक आहे की, मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या काळात सामान्य दैनंदिन कामे करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. असे कोणतेही संशोधन आजपर्यंत झालेले नाही, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मासिक पाळीच्या काळात केस धुण्यामुळे तुमचे रक्त गोठण्यावर कोणत्याही प्रकारे परिणाम होतो. मासिक पाळी दरम्यान केस धुणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )