what foods should not be eaten in kidney stones marathi: आजकाल किडनी स्टोन अर्थातच मुतखडा हा एक सामान्य आजार झाला आहे. किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो रक्त फिल्टर करतो. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किडनीचे कार्य बिघडते. खाण्यापिण्याच्या सवयी दीर्घकाळ पाळल्या नाहीत तर मुतखडे बनू लागतात. त्यामुळे अनेकवेळा पोट आणि कंबरेत असह्य वेदना होतात. यासाठी दररोज भरपूर पाणी प्यावे. मुतखड्याचा रूग्णांनी काही गोष्टींचे सेवन टाळावे ज्यामुळे किडनी स्टोनचा आकार वाढतो आणि वेदना होतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनच्या रुग्णांनी चुकूनही कोणत्या गोष्टी खाऊ नयेत.
मुतखड्याचा त्रास असलेल्या लोकांनी बीट, गाजर, बटाटा आणि पालक यांसारख्या भाज्यांचे सेवन टाळावे. कारण त्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मुतखड्याची समस्या वाढते. ऑक्सलेट शरीरात कॅल्शियम साठवते आणि लघवीला जाऊ देत नाही. त्यामुळे खडे तयार होतात.
व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे जास्त सेवन केल्याने देखील मुतखडे तयार होतात. म्हणून, ते ठराविक प्रमाणातच खा. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोनच्या रूग्णांनी सोयाबीन, सपोटा, वाळलेले सोयाबीन, उडीद डाळ, कच्चा तांदूळ, वांग्याच्या बिया आणि टोमॅटोचे जास्त सेवन करू नये. या सर्वांमुळे मुतखड्याची समस्या वाढू शकते.
जास्त प्रमाणात सोडियमयुक्त आहार घेतल्यास किडनी स्टोनचा धोका वाढतो आणि लघवीद्वारे जास्त कॅल्शियम जाते. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. मुतखड्याच्या रुग्णांना मर्यादित प्रमाणात मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळावे कारण त्यात मीठ आणि तेलाचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला मुतखड्याची निर्मिती टाळायची असेल किंवा खड्यांचा आकार वाढवायचा नसेल तर तुमच्या जेवणात जास्त मीठ वापरणे टाळा.
जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने वारंवार लघवी करण्याची इच्छा निर्माण होते. ज्यामुळे शरीरात निर्जलीकरण होते आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. दुसरीकडे, जर तुम्हाला आधीच किडनी स्टोनची समस्या असेल तर कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन टाळा किंवा ते मर्यादित प्रमाणात घ्या.
मुतखड्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी मांसाहार टाळावा कारण त्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे किडनीवर विपरीत परिणाम होतो. जे लोक प्रथिनेयुक्त अन्न खातात त्यांच्या शरीरात प्युरिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे युरिक ॲसिडची पातळी वाढते आणि परिणामी किडनी स्टोनचा आकारही वाढतो. अशा रुग्णांनी विशेषतः लाल मांसाचे सेवन टाळावे.