Diet plan for 6 month old baby: आईबाबा बनणे हे प्रत्येक विवाहित जोडप्याचे सर्वात मोठे स्वप्न असते. आईबाबा बनल्याने आयुष्यात नवा बहर तर येतोच, शिवाय अनेक जबाबदाऱ्यासुद्धा येतात. बाळाच्या संगोपनापासून त्याच्या शारीरिक वाढीपर्यंत अनेक गोष्टींची जबाबदारी आई वडिलांना सांभाळावी लागते. खासकरून आईला मुलाचे पोट भरण्याचे मोठे चॅलेंज असते. बहुतांश नवीन पालक आपल्या लहान मुलाला काय खायला द्यावे आणि काय खाऊ नये या संभ्रमात असतात. मुलांची पचनसंस्था अतिशय संवेदनशील असते आणि त्यांना अनेक पदार्थांची ॲलर्जी असू शकते. अशा परिस्थितीत मुलाला काहीही खायला घालण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. पालक सहसा विचारतात की ६ महिन्यांनंतर मुलांनी कोणता आहार घ्यावा. याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
तज्ज्ञांच्या मते, जन्मानंतर, जवळपास ६ महिने बाळाला फक्त स्तनपानच केले पाहिजे. याशिवाय पाणीही देऊ नये. ६ महिन्यांनंतर, स्तनपानासोबत अर्ध घन पदार्थ दिले जाऊ शकतात. ७ महिन्यांनंतर आपण पदार्थांची घनता वाढवू शकता. आणि १ वर्षानंतर आपण हळूहळू घन आहार देणे सुरू करू शकता. यामुळे, बाळाला आवश्यक पोषक तत्त्वे मिळू लागतील. आणि त्याची वाढ जलद होईल. मुलांसाठी योग्य आहाराचे पालन करणे खूप महत्वाचे आहे.
जन्माच्या ६ महिन्यांनंतर, स्तनपानाव्यतिरिक्त, मुलांना घन स्वरूपात भात आणि विविध प्रकारचे कडधान्ये खायला देऊ शकता. याशिवाय तुम्ही केळी, सफरचंद किंवा नाशपाती नीट कुस्करून थोडे थोडे खायला घालू शकता.नंतर १ ते २ आठवड्यांनंतर, गाजर, सोयाबीन आणि बटाटे उकडलेले, चांगले बारीक करून खायला दिले जाऊ शकतात. सुरुवातीला या गोष्टी दिवसातून एकदा खायला द्याव्यात आणि २-३ चमचे पाणी द्यावे. हळूहळू अन्न आणि पाण्याचे प्रमाण वाढवा.
एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही मुलांना कोणतेही नवीन अन्न खायला द्याल, तेव्हा ते शक्यतो दिवसा द्या. कारण जर त्या बाळाला त्या अन्नाची ऍलर्जी असेल तर त्याला जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात. आणि असे खरंच झाल्यास, पुढील १ महिना ते अन्न खाऊ घालू नका. तुम्ही ते अन्न १ महिन्यानंतर पुन्हा चारून पाहू शकता. पुन्हा त्याच समस्या उद्भवल्यास, काही महिने देणे टाळाच. अशावेळी शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तज्ज्ञांच्या मते, तुमचे बाळ १ वर्षाचे होईपर्यंत, त्याला हिरव्या भाज्या, पॅकिंग ज्यूस, बिस्किटे, अंडी किंवा साखर खाऊ देऊ नका. शिवाय ६ महिन्यांपासून १२ महिन्यांपर्यंत खूप कमी प्रमाणात मीठ घालून पदार्थ द्या. बिस्किटे आणि ज्यूस टाळावे कारण त्यात जास्त साखर असते. त्याऐवजी फळांचा गर काढून तो कुस्करून देणे चांगले. अक्रोड आणि इतर सुका मेवा १ वर्षानंतरच खायला द्यावा. जेणेकरून बाळाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी जाणवणार नाही. आणि त्या पदार्थांचे पचनही होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)